‘थेट पाइपलाइन योजनेचा रस्ते प्रकल्प होऊ देऊ नका’ हा संदेश देत यंदाची १८वी शाहू मॅरेथॉन १६ फेब्रुवारी रोजी धावणार आहे. एकूण १४ गटांत ही स्पर्धा घेतली जाणार असून, स्पध्रेतील विजेत्यांना १ लाख १० हजाराचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी रविवारी दिली.
   ‘समता, साक्षरता, व क्रीडा विकास’ हा राजर्षी शाहूंचा विचार युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून श्री बिनखांबी गणेश मित्रमंडळातर्फे स्पध्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
    खुला पुरुष गटाचे अंतर २१.२ कि.मी. आहे. बिनखांबी गणेश मंदिरापासून सुरुवात होऊन महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, शाहू स्मारक चौक, कॉलेज चौक, एस. पी. ऑफीस, पितळी गणपती माग्रे मॅरेथॉन कावळा नाका चौक, व्हिक्टर पॅलेस फ्लाय ओव्हर ब्रीज माग्रे शिवाजी विद्यापीठ, शाहू नाका, येथून परत राजाराम कॉलेज चौक, सायबर चौक, एस.एस.सी. बोर्ड, हॉकी स्टेडियम इंदिरा सागर हॉटेल माग्रे नंगिवली चौक, खरी कॉर्नर माग्रे बिनखांबी गणेश मंदिर येथे समाप्त होणार आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १५ हजार १ तर द्वितीय १० हजार १, तर तृतीय क्रमांकाचे ५ हजार १ रुपयांचे बक्षीस असणार आहे.
    खुल्या महिला गटाचे अंतर १०.६ कि.मी. आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५ हजार १ तर द्वितीय ३ हजार १, तर तृतीय क्रमांकाचे २ हजार १ रुपयांचे बक्षीस असणार आहे.  
    शालेय मुले व मुली वयोगट १४ व १७ वर्षांखालील गटांसाठी अनुक्रमे ५ ते ६ कि. मी अंतर असून अनुक्रमे प्रथम २ हजार १, द्वितीय १, ५०१ तृतीय १ हजार १ बक्षीस असणार आहे.
    प्रौढ गट वयोगट ४५ ते ५५, ५६ ते ६५ गटांसाठी ५ कि.मी.चे अंतर असून अनुक्रमे प्रथम क्रमांकाचे १,५०१ द्वितीय १,००१ तर तृतीय क्रमांकाचे ७५१ रुपयांचे बक्षीस असणर आहे.
    १२ वर्षांखालील मुले व मुली, ६५ वर्षांवरील प्रौढ, ४५ वर्षांवरील प्रौढ महिला गटासाठी २ किमी अंतर असून प्रथम क्रमांकाचे १,००१, द्वितीय क्रमांकाचे ७५१, तृतीय क्रमांकाचे ५०१ रुपयांचे पारितोषिक असणार आहे. १० वर्षांखालील मुले व मुली गटाचे अंतर १ किमी असून यासाठी अनुक्रमे १००१, ५०१, ३०१ रुपयांची बक्षिसे असणार आहेत.
    स्पध्रेकरिता जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनची परवानगी घेण्यात आली असून, स्पध्रेची तांत्रिक जबाबदारी असोसिएशन स्वीकारणार आहे. स्पध्रेत सहभागी होण्यासाठी बिनखांबी गणेश मित्रमंडळ कार्यालय, दर्शन दौलत अपार्टमेंट, भूमाई लाँड्री येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला रवि कारेकर, संदीप जाधव, दत्ताजीराव कदम, आर. बी. पाटील, एस. व्ही. सूर्यवंशी. ए. आर. पाटील उपस्थित होते.