दुष्काळ निवारणासाठी नेटाने प्रयत्न करण्याच्या सुचना देतानाच महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी   टँकर, पाण्यासंदर्भातील तुमच्या अडचणी तुम्ही सोडवा ती कारणे लोकांना सांगू नका, त्यांना वेळेवर पाणी द्या असे अधिकाऱ्यांना खडसावले.  
यावर्षी चारा डेपो न देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र २५० जनावरांसाठी छावणी दिली जाणार असून त्यासाठी पाच लाखाची अनामत शासन घेणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व मागेल त्याला रोजगार हमीची कामे यास्वरुपात दुष्काळ निवारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे थोरात यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मंत्री थोरात यांनी आज पठार भागातील गावांना भेटी देत लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. त्यानंतर संगमनेरमध्ये त्यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, निवासी जिल्हाधिकारी सदानंद जाधव, बाजीराव खेमनर, सुरेखा मोरे, माधवराव कानवडे आदी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन तेथील स्थितीची माहिती घ्यावी. पुढील तीन महिन्यांचा काळ मोठा कठीण असेल, आजच सर्तकता बाळगायला शिका. टँकरने पाणीपुरवठा करताना हाताशी काही अतिरीक्त टँकर ठेवा. तालुक्यातील ११५ गावात रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करा. मागणी येताच दुसऱ्या दिवशी त्या गावात रोहयोचे काम सुरु झालेच पाहिजे असे सांगत त्यांनी तालुक्यातील पाणी योजनांची माहिती घेतली. तसेच वीज, चारा, छावण्या, रोहयोच्या कामांचाही आढावा घेतला.
प्रांताधिकारी संदीप निचित यांनी प्रास्ताविकात दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. भुपेंद्र बेंडसे, नायब तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकाचे समाधान केले.