मोबाइल संच चोरून नेल्याच्या संशयावरून दोघा शाळकरी मुलांचे जीपमधून अपहरण करून त्यांना चोरी कबूल करण्यासाठी सिगारेटचे चटके दिल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे घडली.
    बारा व पंधरा वर्षांच्या या शाळकरी मुलांना सिगारेटचे चटके देताना सळई व पट्टय़ाने मारहाण केल्याचे दिसून आले. त्यांच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. त्यानुसार या दोन्ही पीडित मुलांच्या शेजारी राहणारा जीपचालक ज्योतिबा चव्हाण याच्या नातेवाइकाचा मोबाइल संच चोरीला गेला आहे. या चोरीचा संशय चव्हाण याने दोन्ही मुलांवर घेऊन त्याने जीप धुण्याचे निमित्त करून रात्री या दोन्ही मुलांना मित्रांबरोबर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तलावाकाठी नेले. आमचा मोबाइल तुम्हीच चोरला आहे असा आळ घालून ज्योतिबा चव्हाण व इतरांनी दोन्ही मुलांना सळई व पट्टय़ांनी मारहाण केली व नंतर सिगारेटचे चटके दिले.