बहुचर्चित समांतर जलवाहिनीचे हस्तांतरण येत्या १ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. आता संपूर्ण शहराचा कायापालट करणारी महत्त्वाकांक्षी ३९२ कोटींची ड्रेनेज योजना शहरात राबविण्यात येणार आहे. येत्या १३ डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या बैठकीत याची औपचारिकता पूर्ण होईल, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी येथे पत्रकार बैठकीत दिली. महापौर कला ओझा या वेळी उपस्थित होत्या.
नगरोत्थान योजनेंतर्गत शहराला लवकरच हा निधी मिळणार आहे. त्यातून ५० टक्के राज्य सरकार देणार आहे, तर ५० टक्के रक्कम मनपाला उभी करावी लागणार आहे. खैरे यांच्या प्रयत्नांमुळे हडकोने १९२ कोटी मनपाला उपलब्ध करून दिले आहेत. हुडकोकडून १० टक्के व्याजाने कर्ज स्वरूपात उपलब्ध होतील. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या समांतर जलवाहिनीचे येत्या. १ जानेवारीला हस्तांतरण होणार आहे. तोपर्यंत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. सन २०१४ पूर्वी पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईन बदलण्याची कामे पूर्ण होतील, असा दावा खासदार खैरे यांनी केला. शहराची ड्रेनेज लाईन बरीच जुनी, ४०-५० वर्षांची आहे. त्यामुळे ती बदलणे आवश्यक ठरले आहे. या योजनेचे पाईपही कुचकामी ठरले आहेत. पाणीपुरवठा व ड्रेनेज वाहिनीचे काम एकापाठोपाठ सुरू होणे अपेक्षित आहे. हा सर्व निधी येत्या सहा महिन्यांत उपलब्ध होईल.
केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांच्याशी चर्चेनंतर या योजनेला चालना मिळाली. योजनेसाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी देणे मान्य केले असून, महापालिकेची सध्याची खालावलेली आर्थिक स्थिती पाहता उर्वरित निधी हुडकोकडून कर्जाने मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. राज्य सरकारकडून अलीकडेच या बाबत प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आल्याचे खैरे यांनी सांगितले.
दरम्यान, महावितरणशी संबंधित मनपाचे बरेच प्रश्न आपल्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ७७ बैठकांमधून मार्गी लागू शकले. गेल्या वर्षांत ३५ लाखांचा फायदा मनपाला याद्वारे झाला. महावितरणकडे मनपाचा २९ कोटी रुपये निधी आहे. हा निधी उपलब्ध झाल्यावर तोही योजनेसाठी वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले. ड्रेनेज योजनेंतर्गत मुख्य वाहिनी ६१ किलोमीटर लांबीची, तर या वाहिनीला जोडणाऱ्या शहरांतर्गत अन्य वाहिन्या ५५० किलोमीटर लांबीच्या आहेत. ही महत्त्वाकांक्षी योजना शहराचे रंगरूप पालटणारी ठरणार आहे, असे त्यांनी नमूद केले. मनपा स्थायी समितीचे सभापती विकास जैन व सभागृह नेता राजू वैद्य या कामी पाठपुरावा करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2012 रोजी प्रकाशित
औरंगाबाद शहरात ३९२ कोटींची ड्रेनेज योजना
बहुचर्चित समांतर जलवाहिनीचे हस्तांतरण येत्या १ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. आता संपूर्ण शहराचा कायापालट करणारी महत्त्वाकांक्षी ३९२ कोटींची ड्रेनेज योजना शहरात राबविण्यात येणार आहे. येत्या १३ डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या बैठकीत याची औपचारिकता पूर्ण होईल, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी येथे पत्रकार बैठकीत दिली. महापौर कला ओझा या वेळी उपस्थित होत्या.
First published on: 09-12-2012 at 03:22 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drainage project of 392 crore in aurangabad