मुंबईच्या रस्त्यांवर वर्षांला २४ हजार अपघात होत असताना प्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन चालविण्याच्या परवान्यांची खैरात होत असल्याचे दिसत आहे. मोटर वाहन कायद्यातील तरतुदींची पूर्तता न करताच परवाना वाटप होत असल्याने, अशा परवान्यांच्या आधारे गाडय़ा चालविणारे रस्त्यांवर जणू मृत्युदूतच ठरत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये तर ‘कोणीही या, परवाना घेऊन जा!’ अशीच स्थिती आहे.
वास्तविक परवाना देताना देणाऱ्या अधिकाऱ्याने उमेदवाराची कसून चाचणी घेणे आवश्यक असते. यात किमान तीन किलोमीटर किंवा १५-२० मिनिटे गाडी चालवणे आवश्यक आहे. ही गाडी चालवताना उमेदवार मोटर वाहन अधिनियमात दिलेल्या २६ गोष्टींचे पालन करतो का, हे पाहणे अधिकाऱ्याचे काम असते. मात्र हे न बघता सर्रास परवाने दिले जातात, असे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. सर्वात तातडीने आणि जास्तीत जास्त परवाने देण्याचा ‘मान’ अंधेरीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जातो. या कार्यालयात एकच मोटर वाहन निरीक्षक दिवसाला किमान १०० परवाने देतो. वडाळा आणि ताडदेवमध्येही काही फार वेगळी स्थिती नाही.
मोटर वाहन निरीक्षकाने परवाना देताना उमेदवाराच्या बाजूला बसून त्याची चाचणी घेणे आवश्यक आहे. पण अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक एका बंद खोलीत बसून असतो आणि उमेदवाराच्या बाजूला दलाल बसतात आणि त्यांची चाचणी घेतात. वाहन निरीक्षक कागदपत्रे निपटण्यात गुंतले असताना दलालांनी दिलेल्या शेऱ्यावरून ते परवाने देतात, असे एका तज्ज्ञाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. तसेच लायसन्स काढण्यासाठी आलेल्या उमेदवारांकडे गाडी नसल्यास गाडी पुरवण्याचे शंभर रुपयेही दलाल वेगळे घेतात.
याविरुद्ध वडाळा आणि ताडदेव येथील कार्यालयांमध्ये मात्र मोटर वाहन निरीक्षक स्वत: उमेदवारांसह गाडीत बसतात. मात्र या गाडीत आणखी दोन उमेदवारांनाही बसवले जाते. उमेदवार शिकाऊ असू शकतो व त्याच्याकडून चाचणीदरम्यान एखादा अपघातही होऊ शकतो. त्यामुळे आणखी दोन उमेदवारांना मागच्या सीटवर बसवणे धोकादायक ठरू शकते.
अनेकदा गीअर असलेल्या दुचाकी वाहनांचा परवाना घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना ती दुचाकी चालवताही येत नसते. मात्र चारचाकी गाडीबरोबरच दुचाकी चालवण्याची चाचणी घेतली जाते. ही दुचाकी गीअर नसलेली असते. मात्र उमेदवारांना परवाना मिळतो गीयर असलेल्या दुचाकीचा.
भारतात परवाना देण्याची प्रक्रिया अधिक कठोर करायला हवी, असे मत वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोसा यांनी व्यक्त केले. चालकाच्या हाती अनेकांचा जीव असतो. त्यामुळे त्याने नियमांचे काटेकोर पालन केले आहे अथवा नाही, हे पाहायलाच हवे. अनेक पाश्चात्य देशांमध्ये वाहन चालविण्याचा परवाना मिळवणे, हे लग्न करण्यापेक्षा कठीण असते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
अनेक वाहतूकतज्ज्ञांच्या मते वाहन चालविण्याचा परवाना मिळालेल्या अनेक चालकांना रस्त्यावरील चिन्हांचा अर्थही माहीत नसतो. परवाना देताना चाचणीदरम्यान प्रत्येक चालकाला किमान ३० मिनिटे गाडी चालवण्यास सांगायला हवे. त्याशिवाय तो कशी गाडी चालवतो, हे कळणे कठीण असते, असे निरीक्षणही एका तज्ज्ञाने नोंदवले.