सोलापूर जिल्ह्य़ात पडलेला दुष्काळ हा नैसर्गिक नसून, तो केवळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या मंडळींनी निर्माण केल्याचा घणाघाती आरोप जनसेवा संघटनेचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केला आहे. सोलापूरच्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करावे असा फुकटचा सल्ला देणाऱ्यांनी बारामतीमध्ये किती ठिबक सिंचनाचा वापर होतो हे पाहावे, असा टोलाही त्यांनी पवार काका-पुतण्यास मारला.
येथील जनसेवा संघटनेच्या कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पवार काका-पुतण्यास विशेष लक्ष्य बनविले. बारामतीत पाण्याचे पाट वाहत असताना सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा असे फुकटचे सल्ले देणे, हा कुठला न्याय आहे, असा सवाल उपस्थित करीत, असे असेल तर सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकरी जनतेनेही आता विचार करावा. अशा फुकटच्या सल्ल्यामुळेच सोलापूर जिल्ह्य़ावर अन्याय होत आल्याची प्रतिक्रियाही धवलसिंहांनी व्यक्त केली. शरद पवार यांना माढा लोकसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्य़ातील जनतेने निवडून दिले, ही चूक होती काय, असा सवाल त्यांनी परखडपणे उपस्थित केला.
दुष्काळी सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरणातील पाण्याचा नियोजनबाह्य़ वापर झाल्याचे नमूद करताना, या धरणात गेल्या वर्षी तब्बल ११४ टक्के पाण्याचा साठा होता. हा साठा केवळ वर्ष पूर्ण होण्याच्या आत संपुष्टात आला व तो वजा ३७ टक्क्य़ांपर्यंत खाली गेला. धरणातील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असलेला पाण्याचा साठा कोणी पळविला.? त्यानंतर अलीकडे दोन महिन्यात धरणातून पुन्हा नियोजनबाह्य़ पाणी सोडण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्य़ावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. म्हणजे हा दुष्काळ मानवनिर्मित अर्थात राष्ट्रवादीनिर्मित असल्याचा आरोप धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केला. उजनी धरणात पुण्यातून पाणी सोडण्याची मागणी रास्त असताना त्याबद्दल नकारघंटा वाजवित आलमट्टी धरणाचे पाणी खरेदी करायची भाषा अजित पवार यांनी केली, त्याबद्दल संताप व्यक्त करताना आपण आपल्या घरातले पाणी देऊ शकत नाही तर आलमट्टी धरणाचे पाणी खरेदी करून देण्याची भाषा का म्हणून करायची, असा सवाल त्यांनी केला. धवलसिंह हे काँग्रेसचे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र, तर राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत.