पारंपरिक सण आणि उत्सवांमधील बाजारीकरणाचे प्रमाण वाढले असून या बाजारीकरणाविरोधात आवाज उठवत पारंपरिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम कल्याणच्या सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळाने यंदा राबवला आहे. गणेशोत्सवाचा देखावा, निमंत्रण पत्रिका, स्मरणिका, मनोरंजनात्मक कार्यक्रम या सर्वावर या पर्यावरणस्नेही उपक्रमाची छाप असून मंडळाच्या वतीने गणेश दर्शनासाठी येणाऱ्या सर्व गणेशभक्तांना पर्यावरण जागृतीचे स्टिकर्स देऊन पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
कल्याणमध्ये १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. १९०६ मध्ये टिळकांनी या गणेशोत्सव मंडळास भेट देऊन या मंडळाच्या जनजागृती उपक्रमांना आपला पाठिंबा दर्शविला होता. १२० व्या वर्षांमध्ये पदार्पण करत असलेल्या या उत्सवाने पर्यावरणावरील मानवी आक्रमणाचे चित्र आपल्या देखाव्यातून मांडले आहे.
यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी रिद्धी-सिद्धी या महिलांच्या मंडळाने घेतली आहे तर देखाव्याची संकल्पना साकारण्याचे काम राम जोशी यांनी केली आहे. पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आवाजाच्या प्रदूषणाचा निर्माण झालेला वाद, उत्साहातील धांगडधिंगाणा, सणांचे बाजारीकरण या सर्व अपप्रवृत्तीला विरोध करणारा आणि पर्यावरण जागृती करणारा देखावा सुभेदारवाडय़ाने साकारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘विवेकाच्या आवाजा’ला प्रतिसाद!
‘लोकसत्ता’ने उत्सवातील धांगडधिंगाण्याला केलेल्या ठाम विरोधातून प्रेरणा घेत आणि या संकल्पनेला समर्थन देण्यासाठीच मंडळाने हा देखावा साकार केला असून पर्यावरण जागृतीचा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, अशी माहिती देखाव्याची संकल्पना साकार करणारे राम जोशी यांनी दिली. मंडळाची स्मरणिका तसेच निमंत्रण पत्रिकांवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश असून येणाऱ्या प्रत्येकाला पर्यावरण जागृतीचा संदेश देणारे स्टिकर्स देऊन त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे. ध्वनिप्रदूषणाबरोबरीनेच जल, वायू आणि पृथ्वी यावरील मानवाच्या अतिक्रमणाचे पडसादही आम्ही यातून दाखविले आहेत. गणेशमूर्तीही विषयाला अनुरूप असून ‘मानवा हे तू काय चालवले आहेस’ असा प्रश्न गणपती विचारत असल्याचे देखाव्यातून साकारण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.

 

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco friendly ganesh utsav in kalyan subhedar wada
First published on: 03-09-2014 at 06:43 IST