उपेक्षितांच्या उत्कर्षासाठी प्रभावीपणे कार्यरत असलेल्या स्नेहालय प्रकल्पाचा व्याप वाढल्यामुळे संस्थेसमोर आता आर्थिक विवंचना उभ्या राहिल्या आहेत. मान्यवरांच्या स्नेहभेटींमुळे संस्थेकडील मदतीचा ओघ मंदावल्याने या अडचणी सुरू झाल्या असून, त्याचा परिणाम या कामावर होण्याची भीती लक्षात घेऊन समाजानेच आता मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे.
कुलकर्णी यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी सांगितले, की बालके व उपेक्षित महिलांच्या उत्कर्षांसाठी संस्था कार्यरत आहे. मात्र आर्थिक अडचणींअभावी आता त्यांच्या पोषणाचीच चिंता निर्माण झाली आहे. संस्थेतील कर्मचा-यांचे पगारही वेळेवर करणे जिकिरीचे होऊ लागले आहे. अलीकडच्या काळात अनेक मान्यवरांनी संस्थेला भेटी देऊन संस्थेच्या विविध उपक्रमांना हजेरी लावली. त्यामुळे बहुधा आता संस्थेचा गाडा सुरळीत असल्याच्या भावनेने संस्थेकडील मदतीचा ओघ मंदावला आहे. स्थापनेपासून संस्था समाजाच्या मदतीवरच कार्यरत आहे. आजवर संस्थेला समाजानेच मोठी मदत केली, किंबहुना स्वत:च्या पायावर उभे केले. मात्र आता पुन्हा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संस्थेत सुमारे तीनशे कर्मचारी आहेत. त्यांचे वेतनही गेल्या काही महिन्यांपासून अनियमित आहे. कर्मचा-यांच्या वेतनासह वीज, पाणी, भोजन, संस्थेतील विविध योजनांची देखभाल दुरुस्ती या गोष्टींसाठीच मोठय़ा निधीची नितांत गरज असते. हे सारे नियमित खर्च आहेत, मात्र निधीअभावी त्याचीच अडचण झाल्याने संस्थेतील काही प्रकल्पांचे काम तूर्त थांबले आहे अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
मागच्या पंचवीस वर्षांच्या काळात संस्थेला प्रामुख्याने समाजातील छोटय़ा व मध्यम गटांकडूनच मोठी आर्थिक मदत प्राप्त झाली. या वर्गाकडूनच संस्थेला सातत्याने मदत मिळत राहिली, मात्र आता हा ओघ मंदावला असून, संस्थेच्या भावी वाटचालीच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. संस्थेला नियमित दिनचर्येसाठीच दरमहा १२ लाख रुपये खर्च येतो. हा खर्च कसाबसा भागवावा लागतो. एड्सबाधितांचे रुग्णालय, स्नेहाधार, हिंमतग्राम, रेडिओनगर, अनामप्रेम, बालभवन, स्नेहाधार प्रकल्प, शाळा आदी सर्वच प्रकल्पांची वाटचाल पुरेशा निधीअभावी अडखळली आहे. संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पात २०० बालके आहेत. त्यांच्या पोलनपोषणासाठी निश्चित असे दाते अद्यापि मिळालेले नाहीत. त्यांच्यासाठी संस्थेला नेहमीच दात्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते, अन्य स्रोतांमधून हा प्रकल्प चालवावा लागतो. स्नेहालयला आर्थिक विवंचना मांडताना नेहमीच संकोच वाटतो, मात्र आता या प्रकल्पांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता त्याला पर्याय राहिला नाही. संस्थेतील बालके व महिलांच्या एक वेळचा जेवणाचा खर्च दात्यांनी उचलावा, अशी स्नेहालय परिवाराची अपेक्षा असून, त्यादृष्टीने समाजाने हातभार लावावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
नगर हे संस्थेचे मुख्यालय आहे, मात्र राज्यातील अनेक शहरे व जिल्हय़ांमध्ये संस्थेचे कार्य आता सुरू आहे. त्याचाही व्याप वाढू लागला आहे. समाजातील दात्यांनी मदतीसाठी संस्थांच्या या प्रकल्पांशी किंवा अंबादास चव्हाण (९०११०२०१७१), रोहित परदेशी (९८५०१२८६७८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘स्नेहालय’ समोर आर्थिक विवंचना
उपेक्षितांच्या उत्कर्षांसाठी प्रभावीपणे कार्यरत असलेल्या स्नेहालय प्रकल्पाचा व्याप वाढल्यामुळे संस्थेसमोर आता आर्थिक विवंचना उभ्या राहिल्या आहेत.
First published on: 06-02-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economical problem to snehalaya