एचआयव्हीच्या भयाण आजारामुळे त्यांच्या आयुष्यातील रंग उडाले असले तरी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा आणि यश फाऊंडेशन  यांच्या वतीने त्यांच्या जीवनात उमेदीचे रंग भरण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येत असून त्याअंतर्गत येथील एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्यांसाठी ‘गंमत-जंमत’ लॉन्सवर रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते.
सप्तरंगांची व फुलांची उधळण करून एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या सर्वानी रंगपंचमीचा आनंद लुटला. सर्वच सण साजरे करून या व्यक्तींना व बालगोपाळांना सर्वसामान्यांप्रमाणे सकारात्मक दृिष्टने आयुष्य जगता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिका उपायुक्त विजय पगार, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे कमलाकर धोंगडे, नामदेव येलमामे, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लहानग्यांनी राधा-कृष्णासारखा पेहराव करून प्रमुख पाहुण्यांना रंगाचा टिळा लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी मुलांवर रंगांची उधळण करून कार्यक्रमाला सुरूवात केली. पाहुण्यांच्या हस्ते पिचकारीचे वाटप करण्यात आले. प्रास्तविक रवींद्र पाटील यांनी  केले. सूत्रसंचालन संगीता पवार यांनी केले. आभार मनिषा घुगे यांनी मानले.