सांगली महापालिका क्षेत्रात यंदा तब्बल एक हजार ४२ मंडळांनी सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून आकर्षक सजावट, विविध प्रतिकृती, पौराणिक देखावे गणेशभक्तांसाठी खुले झाले असून गर्दीने रस्ते फुलू लागले आहेत. कृत्रिम देखाव्यांसोबतच जिवंत देखावे सादर करण्याची काही मंडळांनी परंपरा कायम राखली असून स्त्रीभ्रूण हत्या, माणूस, नशाबंदी व बोकाळलेला भ्रष्टाचार आदी सामाजिक समस्यांना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हात घातला आहे.
सांगली शहरात ३४८ मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांची रिघ लागत आहे. श्रीकृष्णाचे वैश्विक रूप, सीता स्वयंवर, योगीराजाचा जन्म, महाकाय शंभु महादेवाची िपड आदी देखावे आकर्षक झाले आहेत. सांगलीत मुलगी वाचवा हा संदेश देणारा देखावा सादर करून समाजातील स्त्री-पुरुष असमानतेवर भाष्य काही मंडळांनी केले आहे. तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश बहुसंख्य मंडळांनी प्रदíशत केला आहे.
सांगलीतील कॉलेज कॉर्नर, गणपती पेठ, मारुती चौक, शास्त्री चौक, चांदणी चौक, शिलंगण चौक आदी ठिकाणची मंडळे देखाव्यासाठी प्रसिध्द आहेत. शहीद भगतसिंग, सावकार, व्यापारी, लक्ष्मी नारायण, मोटार मालक संघ, सराफ कट्टा, झाशी चौक, विजयंता व रणझुंझार आदी मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे.
मिरज शहरात कृत्रिम देखाव्यांपेक्षा भव्य मूर्ती हे यंदाचे आकर्षण ठरले आहे. बुधवार पेठेतील शिवगर्जना मंडळाने २५ फूट मूर्ती उभारली आहे. याशिवाय वाळवे गल्लीतील मंगलमूर्ती २५ फूट लांब व दहा फूट उंचीचे शिविलग सादर करून त्याद्वारे १२ ज्योतिर्लिगाचे दर्शन घडविले आहे. उदगाव वेस मंडळाने माणसाच्या गर्दीत माणूस शोधण्याचा प्रयत्न जिवंत देखाव्याद्वारे सादर केला आहे. कनवाडकर हौद येथील शिवगर्जना मंडळाने २१ फुटी रुद्रावतारातील, तर त्रिमूर्ती गणेश मंडळाने नंदीवर स्वार असणाऱ्या शंकराच्या रूपातील गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
ब्राम्हणपुरीतील विश्व गणेशोत्सव मंडळाने थ्रीडी डिजिटल लेसर किरणांद्वारे सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केला आहे. जिवंत देखाव्यांसाठी प्रसिध्द असणाऱ्या उदगाव वेस गणेशोत्सव मंडळाने देव भूमीतील जलप्रलय छायाचित्राद्वारे प्रदíशत केला आहे.
सांगलीत ३४८, विश्रामबाग येथे २४३, मिरज शहरात २७८, तर कुपवाड व औद्योगिक वसाहत येथे १७३ सार्वजनिक मंडळांनी चालूवर्षी गणेशाची स्थापना केली आहे. सांगलीतील शाही गणेशोत्सव मिरवणूक शुक्रवारी होत असून सरकारी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांची काही मंडळात अद्याप देखाव्यांच्या अंतिम चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे.