जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना चालू आर्थिक वर्षांतील कामाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने रजेवर निर्बंध घातले. मात्र, जि. प. त महत्त्वाचे १० अधिकारी, १७ राजपत्रित व अराजपत्रित मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने कामांचा चांगलाच खोळंबा होत आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. धांडे ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले. आता केवळ महिला-बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासकीय अधिकारी नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे. जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांनी मुख्यमंत्र्यांना जि. प. तील रिक्त जागा भरण्याच्या मागणीचे पत्र १५ जानेवारीला पाठविले.
आजमितीला जि. प. त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, उपकार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग), उपअभियंता बांधकाम (उपविभाग हिंगोली व वसमत), जिल्हा कृषी विकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, पं. स. सेनगाव, राजपत्रित व अराजपत्रित मुख्याध्यापकांची १७ पदे रिक्त आहेत.