अभियांत्रिकी परीक्षेचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून कृष्णा नामदेव पिनाटे (वय १९, मूळगाव. निलंगा, जि. लातूर) या विद्यार्थ्यांने गळफास लावून घेत आत्महत्या केली. शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सिव्हिल इंजिनिअिरग शाखेच्या प्रथम वर्षांचा विद्यार्थी असलेला कृष्णा हा मुलांच्या वसतिगृहातील सी ब्लॉक येथील खोली क्रमांक १०४ मध्ये राहण्यास होता. या खोलीमध्ये त्याच्याच वर्गात शिकणारे आणखी तीन विद्यार्थी राहतात. सध्या त्यांची परीक्षा सुरू असून गुरुवारी पहिला पेपर होता. हा पेपर कृष्णाला अवघड गेला. आजच्या परीक्षेसाठी मित्र सकाळी नऊच्या सुमारास महाविद्यालयामध्ये गेले. ‘तुम्ही पुढे जा, मी येतो’, असे कृष्णाने त्यांना सांगितले खरे. पण, कृष्णा परीक्षेला गेलाच नाही. दुपारी दीडच्या सुमारास परीक्षेहून परतलेल्या मित्रांनी बराच वेळ खोलीचे दार ठोठावले. पण, आतून कृष्णाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी दाराच्या फटीतून पाहिले असता कृष्णाने पंख्याला गळफास लावून घेतला असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने वसतिगृहाच्या वॉर्डनला ही माहिती दिली. वॉर्डनने शिवाजीनगर पोलिसांना कळविल्यानंतर निरीक्षक महेशकुमार सरतापे आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कृष्णाला खाली उतरवले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ कृष्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयाला पाठविला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी मिळाली. पोलीस आणि वसतिगृह प्रशासनाने याबाबतची माहिती कृष्णाच्या पालकांना दिली आहे.
कृष्णा हा एका पायाने अपंग आहे. त्याचे वडील निलंगा येथील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असून आई गृहिणी आहे. स्वभावाने शांत आणि मित्रांमध्ये रमणाऱ्या कृष्णाने आत्महत्या केल्यामुळे वसतिगृह परिसरामध्ये खळबळ उडाली. गेल्याच महिन्यात मित्रांनी कृष्णाचा वाढदिवस साजरा केला होता.
आईची मागितली माफी
आत्महत्या करण्यापूर्वी कृष्णाने आईच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘आई, मला माफ कर. अभियांत्रिकीचा पहिलाच पेपर मला अवघड गेला आहे. त्याचप्रमाणे अपंगत्व असलेला पायदेखील गेल्या काही दिवसांपासून दुखत आहे. हे कुणाला सांगूही शकत नाही. या सर्व गोष्टीचा ताण आल्याने आत्महत्या करीत आहे’, असे कृष्णाने या चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे.