विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या करामतीबरोबरच विविध मनोरंजक आणि मती कुंठित करणाऱ्या खेळ व कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना स्तंभित करण्याची एकूण एक सोय यंदाच्या पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ या तंत्र महोत्सवात करण्यात आली आहे. मग तो ‘एफवन’ कारमध्ये बसण्याचाच नव्हे तर त्याच्या वेगाचा चित्तथरारक अनुभव देणारा ‘सिम्युलेटर’ असो वा ‘रॉक क्लायम्बिंग’चा उत्कंठावर्धक अनुभव देणारा ‘सेट’ असो.
हे खेळ ‘ऑन दि स्पॉट’ खेळता येतील, अशा प्रकारातले आहेत. म्हणजे यासाठी नोंदणीची गरज नाही. यात मनोरंजनाबरोबरच आव्हानाचीही गंमत स्पर्धकांना चाखता येईल. ‘सेलफोन किंवा संगणकावर जे खेळ खेळले जातात त्यात आपली इंद्रिये वगळता शरीरापैकी केवळ बोटांचा काय तो वापर होत असतो. या खेळांमध्ये जो सैनिक शत्रूला गोळ्या घालत असतो किंवा उलटसुलटय़ा उडय़ा मारून आपले लक्ष्य गाठत असतो त्या ठिकाणी आपण स्वत: असू तर तो अनुभव काय असेल? नेमका तोच अनुभव टेकफेस्टमध्ये ‘ओझन’ या शीर्षकाखाली आयोजिण्यात आलेल्या खेळांमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे ‘टेकफेस्ट’च्या आयोजकांपैकी एक असलेल्या सहेशा या विद्यार्थिनीने सांगितले. या स्पर्धामध्ये कुणालाही सहभागी होता येईल. याशिवाय एफवन कार, मर्सिडिझ, पोर्शे आदी जगातील सर्वाधिक महागडय़ा व आलिशान गाडय़ांचे प्रदर्शनही यंदाच्या टेकफेस्टचे आकर्षण असणार आहे.
खेळांबरोबरच जंकयार्ड वॉर्स, पझल मेनिया, टेकफेस्ट फिटेस्ट आदी स्पर्धाचे आयोजन टेकफेस्टमध्ये करण्यात आले आहे. आयआयटीच्या रस्त्यांवरून जाता-येताही विविध प्रकारच्या गमतीशीर व मनोरंजनात्मक खेळांचा आनंद घेता येणार आहे. यात आपल्या अफलातून कलेचे प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या विविध परदेशी कलाकारांचा समावेश असेल. जगातले नामवंत जादूगार, सायकलीवरचे स्टंटवीर, ओरिगामी, पॉटमेकिंग करणारे कलाकार आपली कला पेश करतील.
काही मती गुंतवणारे खेळ
एफवन सिम्युलेटर – एफवन कारमध्ये बसण्याचाच नव्हे तर ती चालविण्याचा थरारक अनुभव यात घेता येईल. हा अनुभव तुमच्या कपाळावर घर्मबिंदू जमा केल्याशिवाय राहणार नाही, असा आयोजकांचा दावा आहे. हा सिम्युलेटर इटालियन बनावटीचा आहे.
रॉक क्लायम्बिंग – खऱ्या नेव्ही सीलप्रमाणे उतरण्याचा अनुभव ‘रॉक क्लायम्बिंग’मधून मिळेल. उतरण्याचा अनुभव घेण्यासाठी वारंवार चढून जावे, असा हा अनुभव असेल.
पेन्ट बॉल – एखाद्या युद्धभूमीवर शत्रूशी दोन हात करताना जो अनुभव असतो तसाच काहीसा अनुभव या खेळात येईल. यात तुम्हाला तुमचे डावपेच अत्यंत हुशारीने आखायचे आहेत.  
बंगी रन – एका ताणल्या जाणाऱ्या (इलॅस्टिक) दोरीने स्पर्धकाला बांधले जाते. या दोरीचे दुसरे टोक विशिष्ट ठिकाणी बांधलेले असते. स्पर्धकाने धावत जितके पुढे जाता येईल तितका प्रयत्न करायचा आहे.