आपल्या मागण्यांसाठी संबंधितांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध पद्धतीने आंदोलनं होत असतात. कुणी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देतात, कुणी मंत्र्यांची गाडी अडवतात, तर कुणी गनिमी पद्धतीने मंत्रालयात शिरतात. पण नुकतेच मुंबईतील एका आंदोलनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. पर्यावरणप्रेमींनी एका प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आंदोलन केले. पण त्या आंदोलनाची ज्या प्रकारे छुप्या पद्धतीने तयारी केली गेली ती फिल्मी कथेलाही मागे टाकेल अशीच होती.
अमेरिका, युरोपप्रमाणे भारतातल्या मोठय़ा शहरात काचेच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. ही काच विशिष्ट पद्धतीची असते. ती एवढी मजबूत असते की जणू काचेची भिंतच. या काचेतून बाहेरून आतले काही दिसत नाही. पण आतून बाहेरचे दिसते. महालक्ष्मी येथे अशीच एक २१ मजली काचेची इमारत आहे. ही इमारत प्रख्यात एस्सार कंपनीची आहे. या काचेच्या इमारतीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी विशिष्ट प्रशिक्षण घेतलेले कुशल कामगार लागतात. (अमेरिकेत प्रगत तंत्रज्ञान असूनही दरवर्षी १० लोक या बाहेरच्या काचा पुसताना मरण पावतात) गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एस्सार कंपनीने इमारतीच्या काचा पुसण्यासाठी एक जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीवरून बंगळूर येथील सिंथल बालसुब्रमण्यम कुमार (२४) या तरुणाने ई मेलद्वारे अर्ज केला होता. आपली कंपनी असून काचेच्या इमारती साफ करण्याचा आम्हाला चांगला अनुभव आहे, असा दावा त्याने केला होता.
काही पत्रव्यवहारानंतर कुमारच्या कंपनीला हे कंत्राट मिळाले.  करारही झाला. २१ जानेवारीला कंपनीचे कर्मचारी ठरल्याप्रमाणे काचा साफ करण्यासाठी आले. काम अत्यंत जोखमीचे होते. त्यांच्या १५ कर्मचाऱ्यांनी यंत्रसामुग्री आणि इतर साहित्याने संपूर्ण दिवस काम केले. दुसऱ्या दिवशी या कामगारांनी पुन्हा कामाला सुरवात केली. दुपारी तीन वाजता अचानक काचा साफ कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेधाचे फलक फडकवले. त्यातील १५ कर्मचारी इमारतीवर लटकले. त्याचवेळी प्रवेशद्वाराच्या बाहेर काही ग्रामस्थांचा जमाव जमला आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. एस्सारने मध्यप्रदेशात एक खाणीचा प्रकल्प सुरू केला आहे. त्या प्रकल्पाला विरोध म्हणून हे आंदोलन करण्यात आले होते. कंपनीच्या बाहेर मध्यप्रदेशातून आलेले आंदोलक जमा झाले होते. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. कंपनीचे लोक जमा झाले. तर काचा पुसणाऱ्या काही कामगारांनीही आंदोलनात भाग घेतला.
मध्य प्रदेशातील ग्रामस्थांनी येऊन विरोध केला हे सजण्यासारखे होते. पण या कर्मचाऱ्यांचा आंदोलनाशी काय संबंध, असा प्रश्न एस्सारच्या कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाला. तेव्हा समजले की इमारतीच्या काचा साफ करणारे हे कामगार नव्हते, तर ‘ग्रीन पीस’ या पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते होते. कंपनीत आंदोलन करण्यासाठी ते कामगार म्हणून घुसले होते. दुपारी ३ ते संध्याकाळी ६ पर्यंत १५ कार्यकर्त्यांनी इमारतीवर लटकून निदर्शने केली. या आंदोलनामुळे मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ताडदेव पोलिसांनी मध्यस्थी करून या कार्यकर्त्यांना खाली उतरवले. १५ जणांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला तर ५२ जणांना बेकायदा जमाव केल्याबद्दल अटक करण्यात आली.
ताडदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक वाघमारे यांनी सांगितले की, हे अतिशय अनोखे आणि पद्धतशीर आंदोलन होते. कार्यकर्त्यांनी काचा साफ करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. गेल्या ऑगस्टमध्ये जाहिरात आल्यानंतर त्यांनी कंपनीत घुसण्याची योजना बनवून प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली होती. अशापद्धतीने उंच इमारतीवर लटकणे जीव धोक्यात घालण्यासारखे होते. सहा महिन्यांपासून आंदोलनाची तयारी करणे, जोखमीचे काम शिकणे आणि मुंबईत येऊन एका मोठय़ा कंपनीत प्रवेश मिळवणे अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण असावे. पुन्हा या साऱ्या तयारीचा या कानाचा त्या कानालाही पत्ता लागला नाही. शिवाय कंपनीची बदनामी करण्याचे उद्दिष्ट मात्र पुरेपूर साध्य झाले. याला म्हणतात गनिमी कावा!