फळबाग सवलतींचा पहिला हप्ता देण्याची कार्यवाही सुरू
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर सुकलेल्या फळबागा वाचविण्यासाठी जाहीर केलेल्या सवलतीनुसार प्रति हेक्टरी ३० हजार रुपये मदतीपैकी पहिल्या हप्त्यात देण्यात येणाऱ्या ५० टक्के रकमेचा निधी केंद्राकडून प्राप्त झाला असून कृषी खात्याच्या तालुका कार्यालयाच्या पातळीवरून ही मदत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आठवडय़ात ही मदत शेतकऱ्यांच्या हातात पडेल अशी अपेक्षा आहे. या सवलतीअंतर्गत राज्यातील १४ जिल्ह्यांसाठी २०० कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यात नाशिक जिल्ह्यासाठी ५० कोटींचा समावेश आहे. दरम्यान या पॅकेजमध्ये समावेश करण्यात न आलेल्या अशा संपूर्णपणे जळालेल्या बागांसाठी शासनाने अद्याप कोणतीही मदत जाहीर केली नसल्याने त्यांच्यासाठी कधी व काय मदत मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
५० पैशांच्या आत पीक आणेवारी असलेल्या जालना, पुणे, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, नाशिक, धुळे, जळगाव, परभणी व बुलढाणा या १४ जिल्ह्यांतील एक लाख ३३ हजार हेक्टरवरील सुकलेल्या फळबागा वाचविण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सवलती जाहीर केल्या होत्या. सध्याच्या टंचाईकाळात ज्या फळबागा विविध उपाययोजना करून पावसाळ्यापर्यंत तग धरू शकतात अशाच फळबागांसाठी या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यास कमाल दोन हेक्टर फळबाग मर्यादेपर्यंत प्रति हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत दोन टप्प्यांत देण्यात येणार आहे. केंद्राने त्यासाठी सुमारे ४०० कोटींची रक्कम देऊ केली असून त्यातील पहिल्या हप्त्यातील प्रति हेक्टरी १५ हजारांची मदत देण्यासाठी २०० कोटींचा निधी राज्य शासनास नुकताच प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३३ हजार हेक्टरवरील डाळिंब, द्राक्ष आदी फळबागा वाचविण्यासाठी या सवलतींतर्गत मदत दिली जाणार आहे.शेतकऱ्यांना मदत देता यावी म्हणून गेल्या महिन्यात सुकलेल्या बागांचे सव्‍‌र्हेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी कृषी खात्यातर्फे तीन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या. ज्या फळबागा विविध उपाययोजना करून पावसाळ्यापर्यंत जगू शकतात त्यांची एक यादी आणिा ज्या बागा पूर्णपणे जळालेल्या आहेत आणि त्या पुनर्जीवित होण्याची सूतराम शक्यता नाही त्यांची दुसरी यादी करण्यात आली होती.
तसेच शेतकऱ्यांच्या स्वप्रयत्नांमुळे ज्या बागा सुकलेल्या नाहीत, अशांची तिसरी यादीदेखील तयार करण्यात आली होती. पैकी सुकलेल्या परंतु वाचविणे शक्य असलेल्या बागांसाठीची मदत देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही आता सुरू झाली आहे. या सवलतींतर्गत दुसरा हप्ता जून महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
सुस्थितीत असलेल्या व पूर्णपणे जळालेल्या बागांसाठी उत्पादनात झालेली घट लक्षात घेता संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी नंतर स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार असल्याचे मध्यंतरी शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते; तथापि अद्याप तशा प्रकारची कोणतेही आदेश काढण्यात आले नाहीत. त्यामुळे पाण्याअभावी नामशेष झालेल्या फळबागांसाठी केव्हा मदत मिळणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.