गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला सर्वच राजकीय पक्षांनी गंभीरतेने घेतल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांची संख्या अडीचपट वाढली. परिणामी, मतदान आणि प्रथम पसंतीच्या आधार मतांची संख्याही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मतमोजणीसही वेळ लागेल, हे नक्की.
पदवीधर मतदारसंघातून प्रतिनिधी पाठविण्यासाठी उद्या मतदान होणार आहे. भंडारा जिल्ह्य़ासाठी २७ हजार, गोंदिया जिल्ह्य़ासाठी २२ हजार, वर्धा जिल्ह्य़ासाठी ३४ हजार, चंद्रपूर जिल्ह्य़ासाठी ४५ हजार, गडचिरोली जिल्ह्य़ासाठी १६ हजार व नागपूर जिल्ह्य़ासाठी २ लाख ४ हजार, अशा एकूण साडेतीन लाख मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. दोन हजार मतपत्रिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदान संपल्यानंतर मतपेटय़ा जिल्हाधिकारी कार्यालयामागील प्रॉव्हिडन्स गर्ल्स हायस्कूलमध्ये पाठविल्या जातील. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सशस्त्र जवान मतपेटय़ांसोबत राहतील. तेथे एका खोलीत त्या ठेवल्या जातील. तेथेही सशस्त्र पोलिसांचा २४ तास पहारा राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तेथे नजर राहील. तेथेच २४ जूनला मतमोजणी होणार आहे. तेथे २४ टेबल राहतील. एका टेबलावर दोन, असे २४ टेबलांसाठी एकूण ४८ मतगणना प्रतिनिधी नियुक्त केले जातील.
ही निवडणूक दहा-वीस वर्षांपूर्वी कुणी गंभीरतेने घेत नव्हते. एकाच पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात सातत्याने निवडून आला. या एकाच पक्षाचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. ते कायम ठेवण्यासाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात मतदारांची नोंदणी केली जात होती. गेल्या दोन निवडणुकांपासून इतरही उमेदवारांनी या मतदारसंघाकडे लक्ष देणे सुरू केले. यंदा तर इतरही राजकीय पक्षांनी या मतदारसंघाकडे धाव घेतली. तीन प्रमुख उमेदवारांसह इतरही उमेदवारांनी मतदार नोंदणीसाठी प्रचंड परिश्रम घेतल्याने यंदा मतदार संख्या वाढली आहे. गेल्या निवडणुकीत १ लाख ७ हजार मतदार होते आणि ५६ टक्के मतदान झाले होते. गेल्या महिनाभरात १० हजार ४७ नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली. यंदा २ लाख ८७ हजार ११८ मतदार आहेत. त्यामुळे मतदानाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दीड लाखाने मतदारांची संख्या वाढल्याने, तसेच इतरही राजकीय पक्षांनी यात रंग भरणे सुरू केल्याने यंदा मतदानाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मतमोजणीची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आणि क्लिष्ट असते. प्रथम पसंतीच्या आधारे मतांची संख्या निश्चित केली जाते. एकूण झालेल्या मतदानापैकी वैध मतांच्या अर्धे अधिक एक बरोबर प्रथम पसंती आधार मत संख्या असते. गेल्या निवडणुकीत १ लाख ७ हजार मतदार
होते आणि मतदान ९६ हजार ५८० मतदारांनी मतदान (५६ टक्के मतदान) केले होते. त्यापैकी ९१ हजार ३८५ मते वैध ठरली. त्याच्या अर्धे अधिक एक म्हणजे एकूण ४५ हजार ६९३ ही प्रथम पसंती आधार संख्या होती.
त्यामुळे उमेदवाराच्या प्रथम पसंती मतांची मोजणी होते. प्रथम पसंती आधार संख्या पूर्ण झाली नाही, तर त्याच्या दुसऱ्या पसंतीक्रमांची मोजणी केली जाते. गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांना पहिल्या पसंतीची ५२ हजार ७६१ मते मिळाली होती. प्रथम पसंती आधार संख्या पूर्ण केल्याने त्यांच्या दुसऱ्या पसंती क्रमांच्या मतांची मोजणी करण्यात आली नव्हती. बबन तायवाडे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते (२८ हजार ८६६) घेतली होती.

गेल्या निवडणुकीचा निकाल
एकूण मतदान ९६ हजार ५८०
अवैध मते ५ हजार १९५
वैध मते ९१ हजार ३८५

उमेदवार                  मिळालेली मते
नितीन गडकरी              ५२७६१
बबन तायवाडे                २८८३६
प्रदीप पडोळे                   ९४७१
मिलिंद ठोंबरे                   १४७
अब्दुल करीम पटेल            ७०
सुरेश शिंदे                          ३३
भय्यालाल तिबुडे                २६
रवींद्र नागोसे                       १७
कल्याणदास राऊत              १४
मनोज पाऊलझगडे              १०