लातुरात प्रत्येक मतदारामागे १०० रुपये खर्च
 
लातूर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचा खर्च तब्बल २ कोटी १० लाख ६९ हजार ४५२ रुपये इतका झाला असल्याची माहिती समोर आली असून २ लाख ७५ हजार मतदार असलेल्या महापालिकेला प्रत्येक मतदारापोटी सुमारे शंभर रुपयांच्या आसपास खर्च करावा लागला आहे.
जिल्ह्य़ातील ५ लाखांपेक्षा अधिक मतदार असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा सरकारचा खर्च ६३ लाख ४० हजार रुपये आहे. शहरातील २ लाख ७५ हजार मतदार असलेल्या भागात २ कोटी १० लाख रुपये खर्च झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवडणुकीतील मतदान केंद्रात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या भत्त्यावर १५ लाख ४ हजार ६०० रुपये खर्च झाला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यासाठी ३ लाख १२ हजार ५४४, भोजन व्यवस्थेवर ९ लाख ८२ हजार ५४७ रुपये, फोटो व व्हीडिओ शूटींगवर २४ लाख ४८ हजार १९७ रुपये खर्च झाला आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी व मतमोजणीतील विद्युत व्यवस्थेसाठी तब्बल ५ लाख ७६ हजार १०६ रुपये खर्च झाला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निवडणूक भत्ता ७ लाख ५० हजार ६०० रुपये आहे तर पोलिसांच्या इंधनावरील खर्च २ लाख १४ हजार ५२४ आहे. मंडप व मंगल सेवेवर १२ लाख रुपये खर्च करण्यात आला.
 किरकोळ खर्चाची सुमारे ५ बिले १० हजार रुपयांपेक्षा अधिकची आहेत. निवडणुकीतील खर्च हा तातडीचा असल्यामुळे या खर्चाकडे फारसे कोणी लक्ष देत नसावे. यातूनच प्रशासनाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.