स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील नोकरभरती घोटाळा प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नसल्याने पोलिसांनी २२ डिसेंबपर्यंत मुदतवाढ मागून घेतली.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत नोकरभरती करतो, असे सांगून ३५० युवकांची कोटय़वधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अमोल पोतदार याने ३५० उमेदवारांकडून कोटय़वधी रुपयांची लुबाडणूक केली. पैसे देणारे काही उमेदवार महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या संबंधातील होते. त्यामुळे संबंधित उमेदवारांचे पैसे वसूल करण्यासाठी १२ नोव्हेबर, २०११ रोजी शारंगधर देशमुख यांनी अमोल पोतदारचे अपहरण करून त्याला अज्ञातस्थळी डांबून ठेवले व त्यांच्या नातेवाइकांकडून तब्बल एक कोटी रुपये वसूल केले.
२८ नोव्हेंबर रोजी पोतदार याची सुटका करण्यात आली. २८ डिसेंबर रोजी याबाबत पोतदार याने पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शारंगधर देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे पोतदार याने कोल्हापूरच्या न्यायालयात अपील दाखल केल्यानंतर देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई झाली. विवेकानंद नोकरभरती घोटाळा प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास करताना विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांची चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाच्या तपासाचा दररोजचा अहवाल पोलीस उपअधीक्षकांकडे पाठवावा. त्यानंतर ४ डिसेंबर २०१२ पर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास करून सीलबंद अहवाल मुंबई उच्च न्यायालयात पाठवण्याचे आदेश राजारामपुरी पोलिसांना दिले होते.