सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात असलेल्या १२ गावांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने ही गावे अंधारात आहेत. वारंवार निवेदन देऊनही महावितरणने दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर रस्त्यावर येऊन हत्ता पाटीवर रास्ता रोको आंदोलन केले.
धानोरा बंजारा, ब्राह्मणी, काळखेडा, कापडसिंगी, ननसी, सालेगाव, उटी पूर्णा, डोंगरगाव, बन, वझर खु., बर्डा, िपपरी या गावांना जिंतूर तालुक्यातील वझर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मात्र, ही १२ गावे सेनगाव तालुक्यात असून वीजपुरवठय़ाची सर्व कामे सेनगाव उपविभागाकडे आहेत. परंतु या विभागाकडून या गावांकडे सतत दुर्लक्ष होत आहे. या १२ गावांतील शेतकऱ्यांनी हत्ता पाटीवर रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या दीड महिन्यापासून वीज खंडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हल्ली उपलब्ध पाणी शेतीला देण्यास वीजपंप चालू करता येत नसल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी होती. जि. प. सदस्य चंद्रकांत हराळ, डोंगरगावचे सरपंच अंकुश राठोड, कापडसिंगी सरपंच सविता हराळ, बामनीचे उद्धव चव्हाण, उटी सरपंच सुभाष वाकडे, सालेगाव सरपंच यादव थोरात, पं. स. सदस्य सुभाष सानप, माधव गडदे यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.