कर्जबाजारीपणा आणि मुलीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी पैसे जमवू न शकल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने दोन मुलींच्या बस्त्याच्या आदल्या दिवशी शेतात गळफास घेतल्याची घटना धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथे घडली. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष तुकाराम हलोर असे या शेतकऱ्याचे नांव आहे. धुळे तालुक्यातील बल्हाणे येथे त्यांची दीड एकर शेती आहे. या शेतात बाजरी पेरली होती. दुष्काळी स्थितीत पिकांना देण्यास पुरेसे पाणी नसल्याने ते करपले. शेतीसाठी सोसायटी व गावातील सावकारांकडून कर्ज घेतले होते. पीक हाती आले नसल्याने या कर्जाची परतफेड करणे अवघड झाले. त्यातच, त्यांच्या दोन मुलींचे विवाह निश्चित झाले होते. एका मुलीचे शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथे तर दुसऱ्या मुलीचे निमखेडी येथे लग्न ठरले. या दोन्ही मुलींच्या बस्त्यासाठी पैशांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न हलोर यांच्याकडून सुरू होता. परंतु, पैसे जमविण्यात अपयश आल्याने ते अस्वस्थ होते. या अस्वस्थतेतून त्यांनी शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. हलोर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.