सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात जिल्ह्यातील तब्बल ३३४३५ हेक्टर अर्थात ८३ हजार ५८७ एकरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याची झळ ५० हजार ४३७ शेतकऱ्यांना बसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले असून त्या खालोखाल द्राक्ष व डाळिंबाला फटका बसल्याचे लक्षात येते. नुकसानीचा तालुकानिहाय विचार करता मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदतीचा हात देण्यात येणार असला तरी वर्षभर गारपीट आणि अवकाळी पावसाच्या माऱ्याने शेती व्यवसाय कोलमडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
ऐन हिवाळ्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. वर्षांच्या अखेरीस कोसळलेल्या संकटाने कांदा, द्राक्ष व डाळिंब पिकांची अक्षरश: धुळधाण उडाली. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजावर नजर टाकल्यास नैसर्गिक संकटाची तीव्रता लक्षात येते. जिल्ह्यातील १० तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यात मालेगाव तालुक्यात ७३०० हेक्टर, दिंडोरी ७००० हेक्टर, निफाड ५५८७, चांदवड ५०००, देवळा ३०२६, येवला २५३७, सिन्नर १४४८, बागलाण १०३३, नांदगाव ४९९, कळवण तालुक्यात ३५ असे एकूण ३३४३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शासनाकडे सादर केला आहे. नैसर्गिक आपत्तीची सर्वाधिक झळ कांद्याला बसली.
या पिकाचे पुन्हा सर्वाधिक नुकसान झाले. शेतातील पिकासह कांदा रोपांचेही नुकसान झाले. यामुळे पुढील काळात बियाण्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होईल, अशी भीती आहे. या संकटात १० तालुक्यातील ५० हजार ४३७ शेतकरी भरडले गेले. द्राक्ष, डाळिंबासह टोमॅटो, गहू, हरभरा, भाजीपाला, मका, ज्वारी आदी पिकांना फटका बसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
एका झटक्यात हजारो शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक वाया गेले. शासनाच्या मदतीकडे बळीराजा डोळे लावून बसला असला तरी वर्षभरापासून सातत्याने चाललेल्या अस्मानी सुलतानीमुळे तो कसा तग धरणार हा प्रश्न आहे. वर्षांच्या सुरुवातीला गारपिटीचा जबरदस्त फटका बसला होता. तेव्हा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले. अधूनमधून अवकाळी पावसाचा सातत्याने फटका बसला. या आपत्तींमुळे जिल्ह्यातील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.
पीकनिहाय नुकसान (हेक्टर)
कांदा – १०५५८, कांदा रोप – ४९९, द्राक्ष – ९०८३
डाळिंब – ८४४७, टोमॅटो – ४५५, भाजीपाला – १५४८, मका – ८५५, ज्वारी – ४५०, गहू – ५६०,
हरभरा झ्र् ९४५

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers nashik news
First published on: 16-12-2014 at 07:03 IST