धुळे जिल्ह्यातील नरडाणा येथे शिरपूर वीज प्रकल्पाकडून ३०० मेगा वॉट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पातून २२० केव्हीच्या दोन वाहिन्या अमळनेर येथील उपकेंद्राला जोडल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने कंपनीकडून अति उच्च दाबाच्या वाहिन्यांसाठी मनोरे उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्यास अमळनेर तालुक्यातील १३ गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. कंपनीकडून संमतीशिवाय शेतात टॉवर उभारणी काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
उपरोक्त विद्युत वाहिनी तालुक्यातील मुडी, प्र. डांगरी, मांडळ, वावरे, आर्डी, तरवाडे, पिंपळे, मंगरूळ, चिमणपुरी, बिलखेडे, बहादरवाडी या गावांच्या शिवारातून जात आहे. त्यासाठी सुमारे १८८ मनोरे उभारले जात आहे. त्यापैकी ९५ मनोरे या गावातील शेत शिवारात उभारले जाणार आहे. एकुण ३५ किलोमीटर लांबीची ही अतिउच्च दाब वाहिनी आहे. कंपनीच्या ठेकेदारकडून शेतकऱ्यांची परवानगी न घेताच शेतात खड्डे खोदून मनोरे उभारणे सुरू आहे. कुणी विरोध केला तर पाच हजार रुपये भाव देऊन कोऱ्या मुद्रांकावर स्वाक्षरी घेतली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. योग्य माहिती न देता २७ बाय २७ चौरस आकाराच्या जागेत मनोरा उभारणी सुरू असून त्यात शेतकऱ्यांची एक गुंठा जमीन जाणार आहे. ही बाब निदर्शनास आल्यावर शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०१४ च्या शासन नियमानुसार बाजार मूल्याच्या पाचपट मोबदला मिळावा किंवा कंपनी नफ्यात भागीदारी अथवा प्रभावित कुटुंबातील एकाला नोकरी मिळावी अशी मागणी केली आहे. या बाबतचे निवेदन तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना देण्यात आले. सप्टेंबर महिन्यात सर्व बाधित गावाच्या तलाठी कार्यालयातील नोटीस फलकावर प्रस्तावित योजनेची अधिसूचना जाहीर करण्याविषयी सांगण्यात आले. शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देण्याविषयी कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात आले. तर शिरपूर वीज प्रकल्पाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याविषयी अनुकूलता दर्शविली.