डाळिंबाची लागवड सध्या मोठय़ा प्रमाणात होत आहे. परंतु केवळ २० टक्के शेतकऱ्यांना चांगले अपेक्षित उत्पादन मिळते. जास्तीत जास्त उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी डाळिंबाची शास्त्रशुद्ध लागवड करावी. लागवडीनंतर सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य डोस डाळिंबास द्यावा, असे प्रा. डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले.
करमाडचे राजीव गांधी महाविद्यालय, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग, तसेच भांबर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. अहिरे म्हणाले, की ताण दिल्यानंतर जमिनीच्या प्रतवारीनुसार जास्तीत जास्त ४५ दिवसांनंतर डाळिंबाच्या काडीला पाणी द्यावे. काडीची काळजी चांगल्याप्रकारे घेतली पाहिजे. काडीचा पोक चांगला झाला तर फूल गळणार नाही, यासाठी डीएपी व पोटॅशची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी. फूलगळ थांबविण्यासाठी पाणीही योग्य क्रमाने द्यावे. असे केल्यास डाळिंबाचे उत्पादन निश्चित वाढेल. सरपंच बळीराम काळे, प्रा. कालिदास फड, प्रगतिशील शेतकरी शेषराव दौंड आदी उपस्थित होते.