जिद्धीला कठोर परिश्रमाची जोड दिल्यास मोठे यश मिळणे अवघड नाही, याची प्रचिती अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील अमोल नागनाथ वाघमारे या मुलाने स्पर्धा परीक्षेत दिली. शेतमजुराच्या या मुलाची सहायक निबंधकपदी निवड झाली. मुलाच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबीयांच्या डोळय़ात आनंदाश्रू तरळले.
शिरूर ताजबंद येथील नागनाथ वाघमारे हे शेतमजूर मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आपल्या मुलांना त्यांनी शिक्षण दिले. मोठा भाऊ शिवाजी गावातील दुकानावर नोकरी करीत होता. मात्र, आपला धाकटा भाऊ अमोल हा शिकून मोठा व्हावा, या साठी आई-वडिलांसह तोही त्याला सतत प्रेरणा देत असे. कुटुंबीयांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमोलने खडतर परिश्रम घेतले. जिद्धीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत चांगले गुण घेऊन अमोल उत्तीर्ण झाला. त्याची सहायक निबंधक म्हणून निवड झाली.
अमोलची बुद्धिमत्ता व परिश्रम लक्षात घेऊन त्याला अभ्यासासाठी लागणारी सर्व पुस्तके त्याच्या मित्रमंडळीनेच पुरवली. कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या प्रेरणेमुळेच आपल्याला यश मिळाल्याचे अमोलने सांगितले.