कृषी पर्यटन हा शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून विकसीत होत असला तरी उत्पन्नाचे साधन निर्माण करणाऱ्या या व्यापक विषयावर सरकारच्या स्तरावर काहीच काम झालेले नाही. ते लक्षात घेऊनच कृषी व पणन विभागाच्या माध्यमातून धोरण आखण्यासाठी लवकरच समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.  
पुणे येथील निसर्ग निर्मिती संस्थेच्या वतीने बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या कृषी पर्यटन व्यवसायिक मार्गदर्शन चर्चासत्रात विखे बोलत होते. संस्थेचे संचालक नितीन मोडक, सचिन नेने, जिल्हा कृषी अधीक्षक अनिल घावटे, उपविभागीय अधिकारी पंडितराव लोणोरे, तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भास्करराव गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. सुरूवातीला विखे यांच्या हस्ते कृषी पर्यटनाबाबत माहितीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.
विखे म्हणाले, पर्यटन आणि कृषी पर्यटन यामध्ये मुलभूत फरक आहे. विशिष्ट ठिकाणे शोधून कृषी पर्यटन केंद्रे विकसीत झाली, तर त्याला निश्चितच चांगले स्वरुप प्राप्त होईल. शिर्डीत येणाऱ्या कोटय़वधी भाविकांचा विचार करुन, कृषी विज्ञान केंद्र आणि कारखान्याच्या सिड फार्मच्या वतीने पर्यटनासाठी काही करता येईल का हे पाहावे, अशी सूचना त्यांनी केली.