* तहसीलदारांचे लेखी आश्वासन
कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावर जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन चौंडी येथील पाझर तलावात कुकडीचे पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर चार दिवसांपासून उपोषम सुरू होते. आज बंदही पाळण्यात आला. दुपारी तहसीलदार विजय कुलांगे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जामखेड तालुक्यास कुकडीचे पाणी सोडावे, तालुक्यात १०० टँकर सुरू करावेत, रोहयाची कामे सुरू करावा, जनावरांच्या छावण्यांची बिले देण्यात यावीत यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. मधूकर राळेभात, राजेंद्र कोठारी, पी. जी. गदादे, मनोज भोरे, सुर्यकांत मोरे,विठठल राउत, भगवान मुरमकर, प्रदीप टापरे, सरपंच कैलास माने यांच्यासह अनेकजण आंदोलनात सहभागी झाले होते.
तीन दिवस झाले तरीही निर्णय होत नसल्याने आज जामखेडकरांनी शहर बंदची हाक दिली होती. लग्नाची मोठी तीथ असुनही सर्व व्यवहार कडकडीत बंद राहिले. खर्डा चौकातून सर्वपक्षीय नेत्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. येथे संतत्प आंदोलक थेट तहसीलदारांच्या दालनात घुसले. तिथे चर्चा झाल्यानंतर दुपारी दीड वाजता तहसीलदार लेखी पत्र घेवून आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांनतर आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे अव्हाने केले. दरम्यान जेष्ठ नेते पी. जी. गदादे यांची प्रकृती उपोषणामुळे खालावल्याने खालवल्याने त्यांना नगर येथील रूग्णालयात हलविण्यात
आले आहे.