लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक डॉ. मधुकर वाकोडे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता त्यांचा गौरव सोहळा अमरावतीत होत आहे. त्यानिमित्ताने या वैदर्भीय मनमोकळ्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला धांडोळा-
गेल्या ३०-३२ वर्षांपासून मी आणि डॉ. वाकोडे परस्परांचे मित्र आहोत. आम्ही परस्परांच्या सहवासात रमून जातो. खरे म्हणजे, यासाठी डॉ. मधुकर वाकोडे हेच अधिक कारणीभूत आहेत. असे त्यांचे अनेक मित्र मग श्रोते होऊन जातो. एकदा कुठल्या तरी चर्चासत्राच्या निमित्ताने बरेच अभ्यासक अमरावती विद्यापीठाच्या अतिथीगृहावर थांबले होते. रात्री बारा वाजेपर्यंत मैफील रंगली. या मैफिलीचे अनभिषिक्त सम्राट होते अर्थातच डॉ. मधुकर वाकोडे. किती तरी लोककथा आणि लोकगीते त्यांच्या मुखातून बाहेर पडत होत्या. गप्पांच्या ओघात लोकरुढी, लोकपरंपरा, दंतकथा, जत्राखेत्रांच्या आठवणी आणि ग्रामीण प्रतिभवंतांच्या प्रतिभेने निर्माण केलेल्या लोककथा.. हास्याचे धबधबे कोसळत होते!
त्यांची पहिली भेटही अशीच माझ्या लक्षात आहे. औरंगाबादला डॉ. मांडे यांनी आयोजित केलेल्या पहिल्या लोकसाहित्य परिषदेसाठी ते आले होते. १९७८ साल असावे. दुपारच्या वेळी कुणी तरी सांगितले की, डॉ. वाकोडे आले आहेत. मी भेटावयास निघालो तर ते विद्यापीठ परिसरातील एका झाडाखाली मांडी घालून बसले होते. सोबतीला मोठा खास वैदर्भी पानपुडा. त्यात पान, सुपारी, विविध प्रकारचे तंबाखू साग्रसंगीत ठेवलेले. भोवती सात-आठ लोकांचा घोळका आणि गप्पा. त्यात लोकसाहित्य हाच एकमेव विषय. बोलण्यातला वैदर्भी शैलीचा मोकळाढाकळा बाज. आरपार आरसपानी व्यक्तिमत्त्व. सगळा पारदर्शी मामला आणि लोकसाहित्याशिवाय दुसरे बोलणे नाही. दुपारच्या सत्रात ‘हनुमंताची निळी घोडी, या जा जाता फुले तोडी’ या लहान मुलींच्या लोकगीतावर त्यांची प्रदीर्घ निबंध. या निळ्या घोडीचा उलगडा करता करता केवढे प्रचंड संदर्भ त्यांनी गोळा केले होते. मानसशास्त्र, कामशास्त्रापासून अनेक पुराणांचा धांडोळा घेत होते. एका लोकगीताच्या निमित्ताने त्यांनी केवढा मोठा अभ्यासाचा परीघ निर्माण केला होता. लोकसाहित्याच्या अभ्यासकाला फार पायपीट आणि पदरचे पैसेही खर्च करावे लागतात. अलीकडे विद्यापीठ अनुदान मंडळ काही निधी देत आहे, परंतु ज्या काळात डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे अभ्यासक संशोधनाला सुरुवात करतात त्या काळात अशी आर्थिक मदत कुठून मिळत नव्हती. डॉ. मधुकर वाकोडे यांच्याकडे काही हजार कॅसेटस् आहेत. या सगळ्या आगळ्यावेगळ्या लोकसाहित्याने भरलेल्या आहेत. विद्यापीठ असो, साहित्य संस्कृती मंडळ असो की, राज्य मराठी विकास संस्था, कुठल्या तरी संस्थेने या कॅसेटस्चे रूपांतर सिडीजमध्ये करण्याची गरज आहे. हे झाले नाही, तर डॉ. मधुकर वाकोडे यांनी जे राष्ट्रीय धन गोळा केले आहे ते सगळे वाया जाईल.
डॉ. मधुकर वाकोडे यांनी लोकसाहित्यासंबंधी तुलनेने थोडेसे लिहिले, परंतु जे लिहिले आहे ते अतिशय मौलिक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा देणारे आहे. त्यातही ते कशाचेही गौरवीकरण वा उदात्तीक रण करीत नाहीत. ते जीवन वास्तवासह लोकसाहित्य समजून घेतात. म्हणून ते मराठीतल्या इतर लोकसाहित्याच्या अभ्यासकांपासून वेगळे ठरतात. डॉ. वाकोडे ललित लेखकही आहेत. ‘झेलझपाट’ आणि ‘सिलीपशेरा’ या त्यांच्या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या. विदर्भातल्या आदिवासींच्या जीवनाचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण करणाऱ्या, परंतु दुर्दैवाने त्यांची दखल मराठी साहित्यविश्वाने पुरेशी घेतली नाही, पण डॉ. मधुकर वाकोडे यांना त्याची फिकीर नसते. त्यांचे सगळे लेखन एकत्र केले तर त्यांना लोकजीवनाविषयी किती आस्था आहे, हेच दिसेल. डॉ. मधुकर वाकोडे यांचेच दुसरे नाव लोकसाहित्याभ्यास होय! पण त्याच्या विद्वतेचा ‘भार’ मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कधी जाणवत नाही. सतत मुक्त व्यक्तिमत्त्व. म्हणूनच ते अनेकांना जवळचे वाटतात. आयुष्यभर ते अंजनगावसुर्जीसारख्या गावी तेथील मातीशी इमान राखून शिकवित राहिले आणि तरीही भारतभर फिरत राहिले. ही खरे तर मोठी किमयाच. छोटय़ाशा गावात राहण्यामुळे अडचणी खूप येतात, पण त्या साऱ्यांवर त्यांनी मात केली. मातीवर प्रेम असल्याशिवाय अशी बांधिलकी येऊ शकत नाही, हेच त्यांच्याकडे पाहिले की पटल्याशिवाय राहत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2015 रोजी प्रकाशित
लोकसाहित्यमय व्यक्तिमत्त्व!
लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक डॉ. मधुकर वाकोडे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता त्यांचा गौरव सोहळा अमरावतीत होत आहे.

First published on: 01-01-2015 at 01:07 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feature article on senior analyst and researcher madhukar wakade on his 71 th birthday