सांडपाण्यातील घन कचऱ्यापासून रेडियमच्या सहाय्याने खत निर्मितीसंदर्भात भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संशोधकांच्या एका पथकाने शुक्रवारी नागपूर महापालिकेला भेट देऊन चर्चा केली.
भाभा अणुसंशोधन केंद्राच्या रेडिएशन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख डॉ. ललित वारसने यांच्या नेतृत्वाखालील डॉ. एस.जी. मरकडेय, डॉ. एस.ई. पवार, डॉ. एस. दत्ता संशोधकांचा या पथकात समावेश होता. त्यांनी महापालिकेत येऊन महापौर अनिल सोले यांची भेट घेतली. आयुक्त श्याम वर्धने, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद गणवीर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सांडपाण्यातील घन कचऱ्यापासून रेडियमचा वापर करूत खत निर्मिती कशी केली जाते, याची माहिती या पथकाने यावेळी दिली. नागपूर शहरात सध्या शंभर दशलक्ष लिटर मल नि:सारणाच्या प्रक्रियेतून सुमारे २५ टन घन कचरा निघतो. यात विषाणू असल्याने त्याचा खतासाठी उपयोग करता येत नाही, अशी माहिती यावेळी उपस्थित असलेले महापालिकेचे अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे यांनी दिली.
हा घन कचरा (स्लज) सूर्य किरणांच्या सहाय्याने कोरडा करून त्यावर रेडिएशनचा मारा केल्यानंतर त्यातील विषाणू नष्ट होतात व त्याची पोषक मूल्ये वाढतात. या दोन्ही प्रक्रिया केल्यानंतर या घन कचऱ्याचा वापर शेतीत खत म्हणून करता येतो. यात जैविक कर्बाम्लाचे प्रमाण यात अधिक असते व त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढेल, असे डॉ. ललित वारसने यांनी सांगितले. या चर्चेत भांडेवाडीमध्ये स्लज ट्रिटमें प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प तयार करण्यास महापालिका उत्सुक असून तसे सहमती पत्र लवकरच भाभा अणुसंशोधन केंद्राला पाठविले जाईल. यातून निर्माण खत शेतकऱ्यांच्या उपयोगी येईल, असे यावेळी महापौर अनिल सोले म्हणाले.