पनवेल नगरपालिकेने हक्काच्या पाणी स्रोतासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको आणि देहरंग धरणातील पाणी विकत घेऊन ते पनवेलकरांना पुरविले जाते. नगरपालिकेने भविष्याचा विचार करून स्वतच्या मालकीच्या जलस्रोतांचा शोध सुरू केला आहे. तालुक्यातील छोटा मोरबे आणि उसरण (देवळोली) अशी या जलस्रोतांची नावे आहेत. यासाठी नगरपालिकेने सुमारे ३८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  
देहरंग धरणापासून शहराला पाण्याची वाहिनी आणण्यासाठी १७ किलोमीटरचा पल्ला पार करावा लागणार आहे. देहरंग धरणापासून छोटा मोरबे हे धरण अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या छोटा मोरबे धरणाची डागडुजी करावी लागणार आहे. या धरणामुळे पनवेल नगरपालिका पाण्यासाठी स्वावलंबी आणि संपन्न होऊ शकते, असा विश्वास मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी व्यकत केला आहे.
पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी नगरपालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. जीर्ण तसेच गंजलेल्या जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. सुजल निर्मल योजनेत ३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव नगरपालिकेने बनविला आहे.