आगीची घटना असो वा कोसळलेली इमारत सदैव मुंबईकरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची एका अग्निशमन केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर पाठवणी करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत आहे. रुग्णवाहिकेतून घडणारा प्रवास टळावा यासाठी जवानांनीच आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवानांची मुस्कटदाबी करून त्यांचा आवाज बंद केला. त्यामुळे एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात जाण्यासाठी जवानांना मुकाटपणे रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागत आहे. जवानांना न्याय देण्यासाठी आता एका महिलेने लढा उभारला असून, महापालिका दरबारी अपयश आल्यामुळे आता या महिलेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे दाद मागितली आहे.
आग, इमारत कोसळणे आदी दुर्घटनांमध्ये मदतीसाठी धावणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन दलाची मुंबईत एकूण ३३ अग्निशमन केंद्रे आहेत. प्रत्येक पाळी सुरू होण्यापूर्वी अग्निशमन केंद्रांमध्ये किती कर्मचारी उपस्थित असणार, किती जण रजेवर असणार याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर कमी कर्मचारी संख्या असलेल्या केंद्रावर अन्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची पाठवणी केली जाते. मुळात अग्निशमन केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आहे. त्यातच कुणी आजारी पडले, कुणी रजेवर गेले की मनुष्यबळाची आणखी कमतरता निर्माण होते. त्यामुळे एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर कर्मचाऱ्यांची पाठवणी करण्याची वेळ नेहमीच अग्निशमन दलावर येत असते.
पूर्वी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन मिनी बस होत्या. त्यातूनच कर्मचाऱ्यांना एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात पाठविण्यात येत होते. मात्र कालौघात या दोन्ही मिनी बस कालबाह्य़ झाल्या. त्यामुळे एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची पाठवणी करण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर सुरू झाला. अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये एकूण २२ रुग्णवाहिका असून त्यापैकी काही जुन्या झाल्या आहेत. मोठय़ा दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळीच उपचार करता यावेत यासाठी आधुनिक सुविधांनीयुक्त अशा चार रुग्णवाहिका पालिकेने घेतल्या. त्या सध्या शीव, नायर, वांद्रे भाभा रुग्णालयाच्या आवारात उभ्या आहेत. आता कर्मचाऱ्यांना दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यासाठी वाहन नसल्याने रुग्णवाहिकांचा सर्रास वापर होऊ लागला आहे.
रुग्णवाहिकेतून आपली पाठवणी होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विनंती करून पाहिली. मात्र परिस्थितीमध्ये कोणताच बदल झाला नाही. त्यामुळे अग्निशमन दलात संताप व्यक्त होऊ लागला आहे. याविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न काही जवानांनी केला होता. मात्र त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. परिणामी आजही जवानांनी एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात जाण्यासाठी रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ‘अभय अभियान ट्रस्ट’च्या अध्यक्षा कविता सांगरुळकर यांनी महापालिका दरबारी धाव घेतली आहे. रुग्णवाहिकेचा वापर कुणासाठी करता येतो याची माहिती कविता सांगरुळकर यांनी पत्र पाठवून परिवहन विभागाकडे मागितली आहे.
रुग्णवाहिकेचा वापर जखमी वा आजारी व्यक्तीची ने-आण करण्यासाठी केला जातो. मात्र अग्निशमन दलातील रुग्णवाहिकांचा वापर कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी होऊ लागला आहे. जखमींची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकेतून जावे लागत असल्याने जवानांचे खच्चीकरण होऊ लागले आहे. जवानांना घेऊन रुग्णवाहिका गेल्यानंतर एखादी दुर्घटना घडल्यानंतर ती घटनास्थळी उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी जखमींचे जीव धोक्यात येतात. त्यामुळे रुग्णवाहिकेचा वापर कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी करू नये, अशी विनंती कविता सांगरुळकर यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2014 रोजी प्रकाशित
अग्निशमन जवानांची यातायात रुग्णवाहिकेतून
आगीची घटना असो वा कोसळलेली इमारत सदैव मुंबईकरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची एका अग्निशमन केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर पाठवणी करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत आहे.
First published on: 12-11-2014 at 05:25 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire brigade employees have to use ambulance for travelling