ऊसतोड मजुरांच्या देखभालीसाठी देशातील पहिले रुग्णालय सुरू करून नॅचरल शुगर परिवाराने नवा इतिहास घडविला असल्याचे प्रतिपादन भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.
नॅचरल शुगरच्या वतीने एन. साई ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कुकडे होते. माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर, माजी आमदार  पाशा पटेल यांची उपस्थिती होती. तेरा वर्षांपूर्वी रांजणीच्या उजाड माळरानावर बी. बी. ठोंबरे यांनी देशातील पहिला खासगी साखर कारखाना उभारला. या कारखान्यावर दरवर्षी लोकोपयोगी नवा प्रकल्प उभारला जातो आहे. स्टीलचे उत्पादन, विजेते उत्पादन, आसवनी, शाळा, दूध डेअरी याबरोबरच आता कारखाना परिसरातील लोकांसाठी व ऊसतोड मजुरांसाठी एन. साईने ग्रामीण रुग्णालय सुरू केले आहे. ऊसतोड कामगारांच्या महिलांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. अनेक वेळा ऊसतोडणीचे काम सुरू असतानाच उसाच्या फडात प्रसूती झाल्याची उदाहरणे आहेत. या महिलांची योग्य देखभाल व्हावी, यासाठी ठोंबरे यांनी रुग्णालय सुरू केले. अशी सामाजिक जाण ठेवून सुरू केलेले देशातील हे पहिले रुग्णालय असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
‘नॅचरल’ने कारखाना चालवत असतानाच त्याला विकासाची जोड दिली. माळरानावर नंदनवन फुलविले. ग्लोबल वॉर्मिगमुळे या वर्षी नंदनवनाचे पुन्हा माळरानात रूपांतर झाले. राज्यात १९६ साखर कारखाने आहेत. पुढच्या वर्षी किमान १०० कारखाने बंद पडतील, असे चित्र आहे. सर्वानी चालवायचे ठरवले तर महिनाभरातच उसाअभावी कारखान्याचे गाळप बंद करावे लागेल. गतवर्षी धनेगाव धरण भरले होते. मात्र, त्यातील पाणी शेतीला सोडताना त्याकडे नीट लक्ष न दिल्यामुळे केवळ तीन पाळय़ांत धरण रिकामे झाले. ६५ टक्के पाणी वाया गेले. संबंधित यंत्रणेने अक्षम्य दुर्लक्ष केले. पाण्याचा वापर योग्य न केल्यास कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते हे सर्वच अनुभवत आहोत. मराठवाडय़ात सरासरी ६०० फुटांच्या खालीच पाणी आहे. ४० वर्षांपूर्वी आडातून पाणी बादलीने घेता येत होते. पाण्याचा अतिरेकी वापर होत असल्याचे दुष्परिणाम सर्वाना भोगावे लागत आहेत. गुजरातमध्ये धरणातील पाणी बंद पाइपद्वारे ९०० किलोमीटपर्यंत नेऊन १६ हजार गावांना दिले गेले. भविष्यात आपल्या हाती राज्य कारभार आल्यास मराठवाडय़ातील लोकांना बंद पाइपद्वारे धरणातून पाणी पोहोचवण्याचे काम आपण हाती घेऊ, असे मुंडे यांनी सांगितले. शिवारातील पाणी शिवारात अडविण्यास लोकांनी पुढे आले पाहिजे. नॅचरल परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाचीही मुंडे यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. बी. बी. ठोंबरे यांनी कारखाना परिसरात गेल्या १३ वर्षांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली. वर्षभरात ४५० कोटींची उलाढाल होत आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आपण या परिसरात विकासकामे हाती घेत असल्याचे सांगितले. अतुल देऊळगावकर यांनी, १९७२च्या दुष्काळात बसलेल्या चटक्यांची जाणूव ठेवून ठोंबरे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. डॉ. गोपाळराव पाटील यांनी, देशात २५ कोटी टन अन्नधान्याची निर्मिती होते तरीही २५ कोटी लोक कुपोषित आहेत. दूध-फळ उत्पादन, पाणी, सूर्यप्रकाश मुबलक उपलब्ध असूनही त्याचा उपयोग सामान्य माणसांसाठी होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. डॉ. अशोक कुकडे यांनी, एन. साईचे पालकत्व विवेकानंद रुग्णालयाने स्वीकारले असून, रुग्णालयास कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे सांगितले. डॉ. दि. बा. गोरे यांनी आभार मानले.