महापालिका हद्दीतील एखाद्या प्रभागातील दारू दुकान हटवण्यासाठी नव्या नियमावलीनुसार मतदान प्रक्रिया राज्यात प्रथमच येथील वडाळी प्रभागात पार पाडली जाणार असून १६ फेब्रुवारीला या प्रभागात दारू दुकानाच्या अस्तित्वाचा फैसला या परिसरातील महिला करणार आहेत.
वडाळी प्रभाग क्रमांक १५ मधील देशी दारू दुकान हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील महिला करीत आहेत. धोबी घाटाच्या बाजुलाच असलेल्या या दारू दुकानामुळे या भागातील सामाजिक आरोग्य बिघडल्याचे महिलांचे म्हणणे आहे. या परिसरात नेहमी भांडणे होतात. समाजकंटकांच्या कारवायांना उत्तेजन मिळते, त्यामुळे हे दुकान बंद केले जावे, अशी महिलांची मागणी आहे. महिलांनी दुकानविरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या महिलांसाठी १६ फेब्रुवारी ही तारीख निर्णायक ठरणार आहे. महापालिकेच्या हद्दीतील एखाद्या प्रभागातील देशी दारूचे दुकान हटवायचे की नाही, याचा निर्णय त्या भागातील महिलांनी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. वडाळी प्रभागात प्रथमच हा प्रयोग होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी मतपत्रिका वापरल्या जाणार असून पांढऱ्या कागदावर ‘दुकान हवे’ आणि ‘दुकान नको’ असे लिहिलेल्या दोन मतपत्रिका राहणार आहेत. मतदानासाठी चिन्हाऐवजी अक्षरांचा वापर होणार असल्याने या भागातील अशिक्षित महिलांना या मतपत्रिका समजतील काय, असा नवा वाद निर्माण झाला आहे. अशिक्षित महिलांकडून चुकीचे मतदान होऊ नये, यासाठी कृती समितीच्या महिला कार्यकर्त्यां या परिसरातील महिलांच्या भेटी घेऊन त्यांना मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात गुंतल्या आहेत. यासाठी महिलांना नमुना मतपत्रिका देखील माहिती देण्यासाठी तयार केल्या आहेत. दुसरीकडे दारू दुकानासाठी अनुकूल मतदान होण्यासाठी काही मध्यस्त हे या परिसरातील महिलांना पर्यटन आणि देवदर्शन घडवून आणण्याचे आमीष दाखवित असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील पुरुष सदस्यांना हाताशी धरून मतदान प्रक्रियेविषयी दिशाभूल करणारी माहिती पोहोचवली जात आहे. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी वडाळी प्रभागातील इंद्रशेषबाबा दरबार संस्थानला तीर्थस्थळाचा ‘क’ दर्जा दिला आहे. या ठिकाणी नागपंचमी आणि रथसप्तमी या धार्मिक उत्सवातून राज्यातून हजारो भाविक येतात. दारू दुकानासमोरूनच यात्रेकरूंना यावे लागते. काही दिवसांपूर्वीच पाच हल्लेखोरांनी दोघा तरुणांवर याच देशी दारू दुकानासमोर प्राणघातक हल्ला केला होता. देशी दारू दुकान हटवण्याविषयी मतदानाची प्रक्रिया राबवण्याचे अधिकार महापालिकेला आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर शासनाच्या दिशानिर्देशानुसारच मतदान प्रक्रिया राबवली जात असल्याचे उपायुक्त, तसेच निवडणूक अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांचे म्हणणे आहे. वडाळी प्रभागातील विविध भागांमध्ये १२ केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. या प्रक्रियेत महापालिकेचे ८० कर्मचारी सहभागी होणार आहेत. एका मतदान केंद्रांवर चार कर्मचारी राहणार आहेत. हे दारू दुकान त्याच ठिकाणी रहावे, यासाठी काही लोक जोरदार प्रयत्नाला लागले आहेत. त्यांच्याकडून मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण केले जाऊ शकतात, अशी भीती या भागातील महिलांमध्ये आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे पाठबळ देशी दारू दुकानाला विरोध करणाऱ्या महिलांच्या पाठीमागे नसले, तरी त्यांच्या कृती समितीच्या माध्यमातून हा लढा पूर्णत्वाला नेण्याचा चंग या महिलांनी बांधला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
दारू दुकाने हटवण्यासाठी प्रथमच मतदान
महापालिका हद्दीतील एखाद्या प्रभागातील दारू दुकान हटवण्यासाठी नव्या नियमावलीनुसार मतदान प्रक्रिया राज्यात प्रथमच येथील वडाळी प्रभागात पार पाडली जाणार असून १६ फेब्रुवारीला या प्रभागात दारू दुकानाच्या अस्तित्वाचा फैसला या परिसरातील महिला करणार आहेत.
First published on: 14-02-2014 at 11:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time voting to remove leaker shop