सोलापूर जिल्हय़ातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे येत्या शुक्रवारी प्रथमच अकलूज येथे येणार आहेत. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात आयोजित बैठकीत शरद पवार हे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
स्वत:च्या माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी प्रश्नावर शरद पवार यांनी यापूर्वी भीमानगर (ता. माढा), भाळवणी (ता. पंढरपूर), करमाळा आदी भागांत आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर आता प्रथमच ते अकलूजमध्ये येऊन आढावा बैठक घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी ९.५० वाजता पवार हे पुण्याहून हेलिकॉप्टरने अकलूजमध्ये दाखल होतील. सकाळी ११ ते दुपारी २पर्यंत सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात पवार हे दुष्काळी परिस्थितीविषयी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन करतील. नंतर दुपारी २ ते ३.४५पर्यंत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर विश्रांती घेतल्यानंतर दुपारी चार वाजता ते हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
दुष्काळी परिस्थितीसंदर्भात आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी आतापर्यंत अकलूजऐवजी अन्य भागात दौरा केला होता. परंतु आता अकलूज येथे आखण्यात आलेला त्यांचा हा दौरा सोलापूर जिल्हय़ातील राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. विशेषत: जिल्हय़ात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी राष्ट्रवादीअंतर्गत उफाळून आलेली गटबाजी व त्यातून पक्षाची होत असलेली पडझड आणि त्यातून एकूणच जिल्हय़ाची होत असलेली पीछेहाट पाहता त्याकडे शरद पवार यांनी स्वत: लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा राजकीय गोटातून ऐकायला मिळत आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्याबाबतचे सूतोवाच नुकतेच केले होते. या पाश्र्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या निमित्ताने शरद पवार यांचा होत असलेला अकलूज दौरा जिल्हय़ातील राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी थोपविण्यास साहय़भूत ठरणार काय, याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.