उरणच्या पाणजे खाडीकिनारी परिसरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनच हजारो मैलांचा प्रवास करीत फ्लेमिंगो या परदेशी जातीच्या पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. त्याचबरोबर इतर विविध जातींचे समुद्री पक्षीही मोठय़ा संख्येने आलेले असून परदेशी पक्ष्यांचे या परिसरातील आगमन ही पक्षीमित्रांसाठी पर्वणीच ठरत आहे. या खाडीत येणाऱ्या हजारो परदेशी पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी पक्षीमित्र येथे येत असतात. मात्र मागील वर्षी झालेल्या फ्लेमिंगोच्या शिकारीच्या पाश्र्वभूमीवर हा खाडी परिसर संरक्षित पट्टा म्हणून घोषित करण्याची मागणी पक्षीमित्रांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैबेरीया, रशिया तसेच इतर देशांतून विविध जातींचे पक्षी दरवर्षी भारतातील विविध ठिकाणी येतात. यापैकी अनेक पक्षी उरण परिसरातही वास्तव्य करीत असतात. उरण परिसरात असलेल्या पाणजे खाडीकिनाऱ्यावर या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असलेले मासे, किडे यांचा मोठा साठा असल्याने मोठय़ा संख्येने पक्षी येत आहेत.यामध्ये फ्लेमिंगो, चित्रबलक, ब्लॅक हेडेड ईबीज, सीगल, बी ईटर, समुद्री गरूड तसेच ओपन हेड बील या विविध जातींच्या पक्ष्यांना न्याहाळणे, त्यांचा अभ्यास करण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ांतील पक्षीमित्र आणि अभ्यासकही आर्वजून येतात. या परिसरात सुरू असलेल्या मातीच्या भरावामुळे खाडीचा भाग कमी होऊ लागल्याने खाडीकिनाऱ्यावरील पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. यातच मागील वर्षी याच परिसरात फ्लेमिंगोची शिकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. पाच वर्षांपूर्वी याच परिसरात झालेल्या शिकारीप्रकरणी नवी मुंबईतील काहींना अटकही करण्यात आलेली होती. त्यामुळे उरण परिसरात येणाऱ्या पक्ष्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आला असल्याचे मत पक्षीमित्र आनंद मढवी यांनी व्यक्त केले आहे. खाडी परिसराला सुरक्षित पट्टा म्हणून घोषित करण्याची मागणी पक्षीप्रेमी प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. वन विभागाने मात्र या परिसरातील परदेशी पक्ष्यांसाठी हे स्थान असल्याने कोणतीही व्यक्ती अशा पक्ष्यांची शिकार अथवा अन्य गोष्टी करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असा फलक या परिसरात लावला आहे.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flamingo in navi mumbai
First published on: 26-11-2014 at 07:12 IST