सरदार सरोवरामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने नंदुरबार जिल्ह्य़ात राबविलेला ‘तरंगता दवाखाना’ हा उपक्रम अडचणीत सापडला आहे. सद्यस्थितीत एक तरंगता दवाखाना (बार्ज) देखभालीअभावी बंद पडला आहे. परिणामी, अक्कलकुवा तालुक्यातील नऊ गावांपर्यंत आरोग्य सेवा पुरविणे जिकिरीचे झाले आहे.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या सातपुडा पर्वतराजीतील नंदुरबार जिल्हा आरोग्यविषयक प्रश्नांमुळे नेहमीच प्रकाशझोतात असतो.
जिल्ह्य़ातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात सध्या आरोग्य सेवा पुरविण्याचे दायित्व असणाऱ्या आरोग्य विभागाला अपुरे मनुष्यबळ, अत्यल्प निधी, औषधसाठा आदी कारणांमुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. धडगाव तालुक्यांतर्गत १३ गावे प्रकल्पबाधित असून त्या ठिकाणी बार्ज अर्थात तरंगत्या नौकेवरील दवाखान्याच्या माध्यमातून रोषमाळ व तोरणमाळ या आरोग्य केंद्रामार्फत आवर्तन पद्धतीने मूलभूत आरोग्य सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र, अक्कलकुवा तालुक्यात येणारे अक्कलकुवा, मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, मुखडी, डनेल या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविणारा तरंगता दवाखाना सध्या बंद अवस्थेत आहे. या तरंगत्या दवाखान्याची स्थिती बिकट होती. बार्जवर कधी वैद्यकीय अधिकारी नसायचे. औषधसाठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसे. यामुळे प्रकल्पबाधितांना आरोग्य सेवा मिळविण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. परिसरात भ्रमणध्वनी चालत नाही. वाहतुकीची कुठल्याही प्रकारची साधने सहजासहजी उपलब्ध नाहीत. साधी डोकेदुखीची गोळी आणायचे म्हटले तर ५ ते १० मैल पायपीट करावी लागते. यामुळे उपरोक्त गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा देणाऱ्या तरंगत्या दवाखान्याचा असणारा आधार निखळून पडला आहे.
बार्जच्या माध्यमातून सरदार सरोवरालगतच्या गावांमध्ये नियमित लसीकरण, विविध आरोग्य तपासण्या, औषधे दिली जात होती. मात्र, मार्च २०१३ मध्ये ही बार्ज दुरुस्तीअभावी बंद पडली. गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या बार्जची कधी दुरुस्तीच झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात अक्कलकुवाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कोठारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही त्यास दुजोरा दिला. युनिसेफ व राज्य सरकारच्या मदतीने तरंगत्या दवाख्यान्याचे काम नियमितपणे सुरू होते. मात्र, बारा वर्षांत केवळ निधीअभावी बार्जची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे ही बार्ज आता पूर्ण बंद पडली आहे. या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून चार-पाच महिन्यांत बार्जची दुरुस्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बार्जची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत म्हणजे जवळपास १० महिने स्थानिक ग्रामस्थ तरंगत्या दवाखान्याच्या सेवेपासून वंचित राहणार आहेत.
आता स्पीड बोटचा पर्याय, पण..
उसलग बारा वर्षे दुरुस्तीअभावी बार्जमधील तरंगता दवाखाना बंद पडल्यामुळे आरोग्य विभागाने ‘स्पीड बोट’चा पर्याय उपलब्ध केला. परंतु, बार्जमधील प्रशस्त दवाखाना आणि ‘स्पीड बोट’ यांची तुलना करणे अवघड आहे. ‘स्पीड बोट’मध्ये केवळ पाच ते सहा जण बसू शकतात. त्यामुळे इच्छा असूनही आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याची कबुली अक्कलकुवा तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. यावर पर्याय म्हणून मणिबेली या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून एक मानद आरोग्य अधिकारी, एक ‘एमपीडब्ल्यू’ आणि नर्स, शिपाई अशा चार जणांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ‘स्पीड बोट’ किंवा बार्जवर आठवडाभर काम करावे लागते. एक प्रकारे ते सागरी नौकेवर काम करण्यासारखे आहे. मग बार्जवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सागरी नौकांवर काम करताना लावल्या जाणाऱ्या ‘ओएनजी’चे नियम लागू करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच बार्जवर ‘जीपीआरएस’ (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) व्यवस्था कार्यान्वित केल्यास रुग्णांची तपासणी करणे सोपे होईल असेही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कोठारी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘तरंगता दवाखाना’च आजारी
सरदार सरोवरामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने नंदुरबार जिल्ह्य़ात राबविलेला ‘तरंगता दवाखाना’ हा उपक्रम अडचणीत सापडला आहे. सद्यस्थितीत एक तरंगता दवाखाना (बार्ज) देखभालीअभावी बंद पडला आहे. परिणामी, अक्कलकुवा तालुक्यातील नऊ गावांपर्यंत आरोग्य सेवा पुरविणे जिकिरीचे झाले आहे.

First published on: 04-07-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Floating hospital activities pressed in nandurbar district