लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त यंदा सोलापुरात विविध मंडळांनी येत्या १ ते ४ ऑगस्टपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांची आखणी केली आहे. लोकशाहीर आण्णा भाऊंच्या जयंती उत्सवाच्या मिरवणुकीप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही केली जाणार आहे.
सोलापूर हे उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. वर्षभरात या शहरात विविध राष्ट्रपुरुषांची जयंती, धार्मिक उत्सव, विविध ऐतिहासिक महापुरुषांचे स्मरण करण्यासाठी सतत उत्सव साजरे केले जातात. दिवसेंदिवस या उत्सवांना भव्यता प्राप्त होत आहे. ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्त आयोजित अक्षता सोहळ्याप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची परंपरा सुरू झाल्यानंतर त्याचे अनुकरण इतर उत्सवांमध्येही केले जात आहे. गतवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली गेली होती. त्यापासून प्रेरणा घेत यंदा लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन सामनेर बहुउद्देशीय संस्था संचलित मातंग क्रांतियुवा संघाच्या वतीने येत्या रविवारी, ४ ऑगस्ट रोजी आण्णा भाऊच्या जयंती उत्सव सांगता मिरवणुकीच्यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याशिवाय बुधवार पेठेत मातंग वस्ती भागात १४ लाख खर्च करून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन येत्या १ ऑगस्ट रोजी आण्णा भाऊंच्या जयंतीदिनी केले जाणार आहे. बसपाचे स्थानिक नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी या सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. तर सदर बझार लष्कर भागात क्रांतिवीर लहूजी वस्ताद मंडळाच्या वतीने २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता बामसेफचे नंदू गायकवाड यांचे ‘मातंग समाजातील महापुरुष आणि त्यांचे कार्य’ या विषयावर व्याख्यान आयोजिले आहे. यावेळी समाजाच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा कृतज्ञतेपोटी सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय रक्तदान शिबिरांसह महिलांसाठी सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजनही करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2013 रोजी प्रकाशित
लोकशाहीर अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
लोकशाहीर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त यंदा सोलापुरात विविध मंडळांनी येत्या १ ते ४ ऑगस्टपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांची आखणी केली आहे. लोकशाहीर आण्णा भाऊंच्या जयंती उत्सवाच्या मिरवणुकीप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही केली जाणार आहे.
First published on: 01-08-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flowers shower from helicopter for anniversary of lokshahir annabhau sathe