महायुतीला सत्तेसाठी चौथ्या पार्टनरची आवश्यकता नसल्याचे रिपाइं नेते रामदास आठवले यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य साथीला झिडकारत हे केवळ माझे मत नाहीतर महायुतीचे व गोपीनाथ मुंडे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत हे भाजपचेही म्हणणे असल्याचे ते म्हणाले. तर ‘टाळी’संदर्भात आताच उत्तर देणार नसल्याचा सावध पवित्रा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी घेतला.
सांगली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी कराड विमानतळावरून सांगलीकडे रवाना होण्यापूर्वी महायुतीचे उभय नेते पत्रकारांशी बोलत होते. भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे, राजाभाऊ देशपांडे, अॅड. वर्षां माडगूळकर, नितीश देशपांडे, भरत पाटील, श्री पेंढारकर, विष्णू पाटसकर आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र विधानसभेच्या १९९५ च्या ऐतिहासिक सत्तांतराचा मुंडे करिष्मा दिसणार का? या प्रश्नावर करिष्मा निश्चित दिसेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्व ऊसक्षेत्र तीन वर्षांत ठिबक सिंचनाखाली आणण्याचा मुख्यमंत्र्यांनी केलेला निर्धार निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु, ठिबक सिंचनाचा मोठा खर्च शेतकऱ्यांना न परवडणार असल्याने राज्य शासनाने यासाठीचा शंभर टक्के खर्च द्यावा अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रावर आपण व्यक्तिश: लक्ष केंद्रित केले असून, विधानसभा व पाठोपाठ लोकसभेच्याही निवडणुकीत आपण या विभागात गांभीर्याने सक्रिय राहणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. अन्न सुरक्षा विधेयक अतिशय व्यापक व महत्त्वाचे असताना त्या संदर्भातील अध्यादेश जारी करणे बरोबर नसून, केंद्रशासनाने घाई केली असल्याची टीका त्यांनी केली. या महत्त्वपूर्ण विधेयकासाठी संसदेचे खास अधिवेशन बोलवावयास हवे होते. असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगली महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाने गुंडांना जवळ केल्याची चर्चा असल्यासंदर्भात विचारले असता ही केवळ चर्चा नव्हेतर गुंडांना उमेदवारी दिली असल्याचे बिनदिक्कत सांगत आर. आर. पाटील यांनी आपण गुन्हेगाराशेजारी बसलो तर मांडी कापा असे वक्तव्य केले होते. पण ते गुन्हेगारांचाच प्रचार करतायेत मग त्यांचे काय कापायचे अशी टीका मुंडे यांनी केली. वाजणाऱ्या आणि न वाजणाऱ्या ‘टाळी’च्या प्रश्नावर आताच उत्तर देणार नसल्याची सावध भूमिका मुंडे यांनी घेतली.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्याला बोलावल्याची चर्चा असल्यासंदर्भात रामदास आठवले यांना विचारले असता या संदर्भात आपल्याला काहीएक माहिती नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलावल्याचे निश्चित आहे. हिंदुत्ववादी महायुतीसोबत रिपाइं या संदर्भात आठवले यांनी काही मुद्यांवर मतभेद असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असतानाही मतभेद नव्हते असे नाही, असे स्पष्ट केले. दुष्काळ निवारणात आलेले अपयश, भ्रष्टाचार, आनागोंदी कारभार आदी मुद्यांवर आघाडी सरकारला सत्तेवरून खेचले जाईल. महायुतीला सत्ता मिळविण्यात अडचण नसल्याचा विश्वास व्यक्त करताना मनसेचा नामोल्लेख टाळत सत्तेसाठी चौथ्या पार्टनरची गरज नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. हे आपले मत की महायुतीचे, यावर हे मत महायुतीचेही व गोपीनाथ मुंडे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत हे भाजपचेही म्हणणे असल्याचे स्पष्ट केले.