सुमारे ८३ लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महाविरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याने सध्याची टंचाई परिस्थिती व जिल्हा परिषदेकडे झालेले हस्तांतरण या पाश्र्वभूमीवर बुऱ्हाणनगर, तसेच मिरी-तिसगाव या प्रादेशिक नळ पाणी योजनांसाठी सोमवारी (दि. १९) मंत्रालयात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील व पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातील पत्रकात जाधव यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर टिका केली आहे.
पालकमंत्री बबनराव पाचपुते, जि.प. अध्यक्ष विट्ठलराव लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, माजी खसदार प्रसाद तनपुरे बैठकीस उपस्थित राहणार आहेत. बुऱ्हाणनगर व ४७ गावे, मिरी-तिसगाव व १७ गावांची प्रादेशिक योजना दुष्काळात बंद पडल्याने नगर व पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थांची पाण्यासाठी मोठी हेळसांड होत आहे. गेल्या चार महिन्यांचे ८२ लाख ७० हजार ७०० रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने दोन्ही पाणी योजनांचे वीज जोड तोडले आहे. १ नोव्हेंबरपासून दोन्ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाल्या आहेत. मंत्रालयातील बैठकीत दोन्ही पाणी योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यासाठी तसेच टंचाई काळात योजना सुरु ठेवण्यासाठी वीज बिल सरकारने अदा करण्याचा तोडगा निघण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने मंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी व महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे, असे जाधव यांनी पत्रकात नमूद केले आहे.
भाजपचे आमदार कर्डिले यांच्या आडमुठेपणामुळे यापूर्वी दोनवेळा बुऱ्हाणनगरची योजना बंद पडली. मंत्री ढोबळे ऑक्टोबरमध्ये राहुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना योजनेचे जि.प.कडे हस्तांतरण होईपर्यंत प्राधिकरण योजना सुरु ठेवावी, असा आदेश दिला होता, परंतु केवळ श्रेय घेण्यासाठी कर्डिले यांनी तातडीने योजना जि.प.कडे हस्तांतरित करणे भाग पाडले व आज या योजना बंद आहेत, बुऱ्हाणनगर पाणी योजनेचे पाणी चोरायचे व पुन्हा श्रेय घेण्यासाठी नगर व पाथर्डी या दोन्ही तालुक्यातील लोकांचे पाण्यासाठी हाल होऊ द्यायचे तसेच योजना सुरळीत न झाल्यास रास्ता रोको करण्यासाठी लोकांच्या भावना भडकावयाचे उद्योग कर्डिले यांनी बंद करावेत. योजनेच्या दुरुस्तीचे काम आपल्याच ठेकेदार बंधूंनी किती निकृष्ट केले याचे आत्मपरिक्षण करावे, असे आवाहन जाधव यांनी केले. कर्डिले यांनी स्वत:च्या स्थानिक विकास निधीतून थकलेले ८३ लाख रुपयांचे वीज बिल भरावे, त्याची मंत्री पाटील यांच्या माध्यमातून अर्थमंत्रालयाची परवानगी मिळून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक प्रयत्न करेल, असा सल्लाही जाधव यांनी दिला.