वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होताच बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार यांनी ‘त्या’ भाषणातून चूक झाल्याचे कबूलही केले. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागू नये, त्यांना माफ करावे, असे आवाहन शरद पवार यांचे खंदे समर्थक पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार बाबुराव आडसकर, लक्ष्मणतात्या जाधव, राधाकृष्ण होके पाटील या दिग्गजांनी संयुक्तपणे केले आहे.
बीड जिल्ह्य़ात अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत दिग्गज नेत्यांची फळी आहे. त्यामुळे अजित पवार यांचा राजीनामा मागू नये, त्यांना महाराष्ट्रातील जनतेने माफ करावे, असे एकत्रित आवाहन शरद पवार यांच्या खंद्या समर्थकांनी केले आहे.
माफी मागितल्यानंतर राजीनामा मागणे चुकीचे आहे. अशा स्थितीत जनतेने पवार यांना एकवेळ माफ करावे. ज्येष्ठ नागरिक या नात्याने आम्ही अजित पवार यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन करीत असल्याचे नमूद केले. यापूर्वी महाराष्ट्रात शिवराळ भाषेत अनेकांनी भाषणे केली. त्यात त्यांची चूकही झाली, याकडे या नेत्यांनी लक्ष वेधले आहे.