नागरिकांच्या तक्रारींची पोलीस ठाण्याच्या पातळीवरच तड लागावी, या हेतूने माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सुरू केलेला पोलीस ठाण्यातील ‘शनिवारचा दरबार’ यावेळी भरलाच नाही. डॉ. सिंग पायउतार झाल्यानंतर प्रभारी आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून कुठल्याही सूचना न आल्याने कुणीही वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्याकडे फिरकले नाहीत. परिणामी तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
पोलीस ठाण्याच्या पातळीवर तक्रारींची तड लागत नाही, अशा तक्रारी माजी आयुक्त डॉ. सिंग यांच्या रविवारच्या दरबारात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी दर शनिवारी पोलीस ठाण्यात जनता दरबार भरविण्याचे आदेश दिले. या दरबारात संबंधित पोलीस ठाण्याचा नव्हे तर अन्य विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. अगदी स्वत: आयुक्तही पोलीस ठाण्यात दरबारात हजर राहू लागले. सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांची एक यादीच प्रत्येक शुक्रवारी प्रसिद्ध होऊ लागली. त्यानुसार शनिवारी संबंधित वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात उपस्थित राहू लागले. याचा परिणाम म्हणजे पोलीस ठाण्याच्या पातळीवरच तक्रारी निकालात निघू लागल्या आणि वरिष्ठांकडे येणाऱ्या तक्रारींच्या संख्येत कमालीची घट झाली. मात्र डॉ. सिंग गेल्यानंतर हा दरबार आपसूकच बरखास्त झाला.