राज्याच्या आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. या बाबत सर्वत्र चर्चा होत असून  खास परभणी जिल्ह्यासाठी राज्यमंत्री फौजिया खान यांच्या पाठपुराव्याने वर्ग एकच्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. लोकसेवा आयोगाकडून या संदर्भात आदेश निर्गमित झाले.
परभणीचे सामान्य रुग्णालय मराठवाडय़ातील मोठे रुग्णालय असून, गेल्या अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय कामकाजात अडथळे निर्माण होत होते. आता ही अडचण दूर होणार आहे. याशिवाय पाथरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपद भरण्यात आले आहे. हे पद स्त्रीरोग तज्ज्ञाचे आहे. येथील रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण रुग्णालय पालम येथे देखील वैद्यकीय अधीक्षक पद भरण्यात आले असून येथे भूलतज्ज्ञाची नियुक्ती झाली. याशिवाय जिल्हा परिषद आरोग्य विभागात सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची ३ पदे रिक्त असून यापकी एक पद भरण्यात आले. नवीन वर्ग एकच्या चार अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना चालना मिळणार आहे, अशी माहिती प्रा. फौजिया खान यांनी दिली.
सिटी स्कॅन मशीन दुरूस्त होणार
जिल्हा सामान्य व महिला रुग्णालयात नवीन एमआरआय, सीटी स्कॅन, एक्सरे मशीन बसविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संजय जाधव यांनी दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार जाधव यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. येथील सीटी स्कॅन मशीन गेल्या मार्चपासून बंद असल्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मान्य करून येत्या १० दिवसांत ते दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले. रिक्त पदे भरण्यासंदर्भात येत्या ऑगस्टअखेपर्यंत जाहिरात देऊन ऑक्टोबपर्यंत सर्व पदे भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात आले.