शहापूर तालुक्यातील आटगांव येथील एका व्यावसायिकास धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवून ७० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबास स्थानिक पोलिसांनी जळगाव येथून अटक केली आहे. याप्रकरणी फरार झालेल्या अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
आटगांव येथे मदन विशे यांची वीटभट्टी, तसेच पत्रे आणि सीमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. जळगांव जिल्ह्य़ातील जामनेर तालुक्यात राहणारा नागनाथ महाराज ऊर्फ गोरख गंगाराम चव्हाण याने व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून मदन विशे यांच्याकडून २५ हजार रुपये रोख आणि सोन्याची साखळी असा ७० हजारांचा ऐवज उकळला होता.
काही दिवसांनंतर विशे कुटुंबीयांना याबाबत संशय येऊन त्यांनी या बाबाविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणी एका भिक्षुकाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीतून गोरख चव्हाण या भोंदूबाबाचे नाव उघड झाले.
शहापूरचे पोलीस हवालदार आर. बी. कोवे, पी. एस. जाधव यांनी जळगावमध्ये जाऊन या भोंदूबाबास अटक केली. त्याचे अन्य दोन सहकारी मात्र फरार आहेत.