रद्द झालेल्या जनरल मुखत्यारपत्राचा आधार घेऊन आनंदवली परिसरातील जागेची बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावून फसवणूक केल्या प्रकरणी चार जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपरोक्त प्रकरण चौकशी प्रक्रियेत असून नेमके दोषी कोण, याचा उलगडा झाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.
या संदर्भात सचिन मंडलिक यांनी तक्रार दिली. मंडलिक यांची आनंदवली शिवारात वडिलोपार्जित सर्वे क्रमांक ३२/२ येथे जागा आहे. तिचा विकसन व शासन करारनामा करण्याचे अधिकार जनरल मुखत्यारपत्राद्वारे बाळासाहेब कोल्हे यांना दिले होते. त्यातील अटी व शर्तीचा भंग झाल्याने तो दस्तावेज नोटिसीद्वारे रद्द करण्यात आल्याचे मंडलिक यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यानच्या काळात लिहून देणार यांचे निधन झाल्यामुळे प्राप्त अधिकार रद्द झाल्याचे माहीत असूनही नातेवाइकांशी संगनमत करून रद्द झालेल्या जनरल मुखत्यारपत्राचा आधार घेऊन या मिळकतीपोटी आपल्यावतीने साडेतीन कोटी रुपये स्वीकारल्याचे दर्शवत खोटा दस्तावेज तयार करण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
त्यावरून बेकायदेशीर खरेदीखत नोंदवून स्वत:च्या फायद्यासाठी मिळकतीची विल्हेवाट लावून आपली फसवणूक झाल्याचे मंडलिक यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात कोल्हे यांच्यासह रमेश बाळू मंडलिक, भीमा बाळू मंडलिक व अजय आशर (मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तपास प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.