जिल्हा बँकेच्या सिरसाळा शाखेअंतर्गत ४७ लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज घेऊन परत भरणा न करता अपहार केल्याप्रकरणी शाखा व्यवस्थापकासह १० संस्थांच्या अध्यक्ष-सचिवांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तलवाडा शाखेअंतर्गत २१ लाख ७७ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी १३ सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.  गुन्हे दाखल झालेल्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत.  बँकेतून कर्ज घेऊन परत न भरणे व परस्पर तारण दिलेल्या मालमत्तेची विक्री करणे असे अनेक प्रकार लेखा परीक्षणात उघडकीस आले आहेत. बँकेचे अध्यक्ष शिवानंद टाकसाळे यांनी या बाबत फिर्याद देऊन वसुलीचे धोरण घेतले. सिरसाळा शाखेतून पीक कर्जापोटी सिरसाळा, पोहनेर, औरंगपूर, कवडगाव हुड्डा, कवडगाव, साबळा, घोडका, आचार्य टाकळी, रेवली, भिलेगाव या गावच्या सोसायटीचे अध्यक्ष-सचिवांनी एकूण ४७ लाख ७२ हजार ८७ रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाचा विनियोग व परतफेडही केली नाही. त्यामुळे सिरसाळा शाखेच्या व्यवस्थापक व १० गावच्या सोसायटय़ांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. तलवाडा शाखेअंतर्गत पीक व शेती विकास मुदत कर्जासाठी १३ संस्थांनी २१ लाख ३३ हजार ७०३ रुपये कर्ज घेऊन त्याचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. तारण मालमत्ताही परस्पर विक्री केल्याचेही उघड झाले. या संस्थांमधील २२ जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.