फ्लॅट खरेदीत फसवणूक केल्याच्या एका वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अरविंदा धुलाभाई मर्श  ही वृद्ध महिला डोंगरे लेआऊटमधील मर्श अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांना फ्लॅट विकावयाचा होता. आरोपी रवींद्र श्रीधर फटिंग (रा. रा. गारोबा मैदान), नाशिरभाई व त्यांचा मित्र त्यांच्याकडे आला. फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दर्शवून ३१ लाख रुपयात सौदा केला. तसा करारनामा केला. त्यावेळी टोकन म्हणुन तीन लाख रुपये त्यांनी दिले. त्यानंतर रजिष्ट्री करण्यासाठी तिनही आरोपींनी त्यांना सोबत नेले. शिल्लक २८ लाख रुपये देण्याचा भरवसा देत त्यांनी साजीद खान नावाचा अकाउंट पेयी चेक दिला. मर्श यांनी बँकेतील खात्यात जमा केला असता चेक धारकाचे खाते बंद झाले असल्याचे बँकेतून कळले. त्यांनी रजिष्ट्री कार्यालयात जाऊन पाहिले असता स्वाक्षरी केली त्यावर तो फ्लॅट १५ लख रुपयात विकला असल्याचा उल्लेख होता. जून २०१२ नंतर हा प्रकार घडला. त्यांनी अंबाझरी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी येथे आरोपी रवींद्र श्रीधर फटिंग (रा. गरोबा मैदान), नाशिरभाई व त्यांचा मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
घर, भूखंड अथवा फ्लॅठ खरेदीत फसवणुकीचे प्रकारही सध्या वाढीस लागले असून शहरात आठवडय़ास सरासरी एक प्रकरण कुठल्या ना कुठल्या पोलीस ठाण्यात दाखल होतेच. एकच भूखंड, शेती, घर अथवा फ्लॅट एकापेक्षा अनेकांना विकल्याच्या तक्रारींचे प्रमाणही मोठे आहे. खऱ्या मालकाऐवजी दुसऱ्यालाच उभे करून परस्पर जमिनी विकल्याच्या घटना घडल्या आहेत. आममुखत्यार पत्र मिळालचा दुरुपयोग करून जमिनी हडपल्याचे प्रकारही घडतात. असे व्यवहार करताना नागरिकांनी बारकाईने कागदपत्रांची खात्री करून मगच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.