येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नावाचे खोटे शिक्के तयार करुन त्यावर दुय्यम निबंधकाच्या खोटय़ा सह्या करुन कागदपत्र तलाठय़ाला दिले. तलाठय़ानेही खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे शेत जमिनींची नोंद करुन फेर-फार, सात-बारा उतारा दिल्याबद्दल राहाता पोलिसांनी शहरातील वकील व तलाठी या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अनिल बाळासाहेब सदाफळ (रा. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहाता पोलिसांनी वकील बाळासाहेब रामराव सदाफळ व तलाठी डी. ए. बडधे या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी संगनमत करुन दुय्यम निबंधक कार्यालय राहाता यांच्या नावाचे खोटे शिक्के तयार करुन ते खरे आहेत असे भासवले. त्यावर दुय्यम निबंधक यांच्या खोटय़ा सह्या करुन सदरचे कागपत्र तलाठय़ाला दिले. त्यावरून तलाठी बडधे याने खोटय़ा कागदपत्रांवरुन शेतजमिनीची नोंद करुन फेर-फार व सात-बारा उतारा तयार करुन तो आरोपी बाळासाहेब सदाफळ याला दिला. दोन वषांपुर्वी जमिनीचे उतारे काढण्यासाठी अनिल सदाफळ तलाठी कार्यालयात गेले असता त्यांना कागदपत्रावरुन शेतजमीन बाळासाहेब सदाफळ याच्या नावे झाल्याचे दिसून आले. सदर जमीन आरोपी बाळासाहेब सदाफळ याच्या नावे कशी झाली, याबाबत कागदपत्र प्राप्त करुन वरिष्ठांकडे  चौकशीसाठी अर्ज केला होता या अर्जाची चौकशी झाली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे अनिल सदाफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वकिल बाळासाहेब सदाफळ व तलाठी बडधे यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा राहाता पोलिसांनी दाखल केला आहे.