नवी मुंबईची एकहाती सत्ता नाईकांच्या हातातून निसटू लागली

लोकसभा निवडणुकीतून न घेतलेला धडा, प्रचारातील पिछाडी, व्होट बँक तयार करण्यात आलेले अपयश, नगरसेवकांची अकार्यक्षमता, जवळच्या गोतावळ्यांचा गराडा, घराणेशाही, सत्ताधारी

लोकसभा निवडणुकीतून न घेतलेला धडा, प्रचारातील पिछाडी, व्होट बँक तयार करण्यात आलेले अपयश, नगरसेवकांची अकार्यक्षमता, जवळच्या गोतावळ्यांचा गराडा, घराणेशाही, सत्ताधारी आघाडी सरकारच्या विरोधात असलेले जनमत आणि अजूनही कायम असलेला मोदीकरिश्मा यांसारख्या कारणांमुळे नवी मुंबईची सत्ता गेली वीस वर्षे एकहाती टिकविणाऱ्या गणेश नाईकांच्या हातातून वाळूसारखी निसटू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांच्या दारुण पराभवामुळे नाईकांना बेलापूर मतदारसंघातून निसटता पराभव पत्करावा लागला आहे. राज्यात युती अभेद्य राहिली असती तर संदीप नाईक यांनाही पराभवाचा सामना करावा लागला असता असे निवडणूक निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत नाईक पुत्र संजीव नाईक सुमारे पावणेतीन लाखांनी पराभूत झाले. त्यांच्या पराभवात नवी मुंबईतील ४९ हजार मतांचा वाटा आहे. या ४९ हजार मतात २५ हजार मते ही बेलापूर मतदारसंघातील होती. त्यामुळे नाईकांनी विधानसभा निवडणुकीत धोक्याची घंटा लक्षात घेऊन सुमारे ५० हजार मतांची जुळवणी करण्याची आवश्यकता होती. ती न करता नाईक गाफील राहिले. त्यामुळे शेवटपर्यंत नाईकांना मतमोजणीत भाजपच्या मंदा म्हात्रे व शिवसेनेचे विजय नाहटा यांना एकाच वेळी कडवी झुंज द्यावी लागली. शिवसेना व भाजप उमेदवार दारोदार फिरून प्रचार करीत असताना नाईकांची मदार स्थानिक स्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर होती. त्यामुळे ते या कार्यकर्त्यांना आपल्या खैरणे येथील व्हाइट हाऊसवर बोलावून मार्गदर्शन करीत होते. त्यात केवळ कार्यकर्ते होते, मतदारांचा पत्ता नव्हता. संदीप नाईक यांच्या मतदारसंघात खैरणे, बोनकोडे, तुर्भे स्टोअर या राष्ट्रवादीच्या व्होट बँका आहेत, पण नाईकांच्या मतदारसंघात अशी सांगण्यासारखी एकही व्होट बँक नसल्याने नाईकांना शेवटचे मतदान यंत्र उघडण्यासाठी वाट पाहावी लागली. नाईकांची मदार त्यांच्या नगरसेवकांवर होती, पण हेच नगरसेवक नाईकांवर नाराज असल्याने त्यांनी म्हणावे तसे काम केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच एका नगरसेवकांच्या प्रभागातील मतदानाएवढय़ा मतांनी नाईकांचा पराभव झाला. गेली अनेक वर्षे नाईकांच्या आजूबाजूला असलेला गोतावळ्यामुळे कार्यकर्ते नाराज असून नाईकांनी भाकरी करपलेली असताना फिरवण्याचे धारिष्टय़ दाखविले नाही. मंत्री, खासदार, आमदार, महापौर ही प्रमुख पदे घरातच असल्याने अनेक वर्षे त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. महत्त्वाच्या पदांसाठी कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे चुरस निर्माण झालेली नाही. सत्ताधारी आघाडीविरोधात असलेले जनमत नाईकांनाही भोवले आहे. त्याचबरोबर मंदा म्हात्रे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला सुशिक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईकर मतदारांनी विजयी करण्यात मोदी लाटेचा मोठा हात असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. नवी मुंबईत भाजपचे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतके असताना केवळ मोदी-प्रेमापोटी येथील मतदारांनी म्हात्रे यांच्या पदरात विजयाचे दान टाकले आहे.
दोन नाईक, दोन विजय, दोन गजानन पराभूत
नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली मतदारसंघाचे वैशिष्टय़ म्हणजे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे गणेश नाईक, त्यांचे पुतणे भाजपचे वैभव नाईक, शिवसेनेचे विजय नाहटा व विजय चौगुले आणि मनसेचे गजानन काळे व गजानन खबाळे हे उमेदवार पराभूत झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ganesh naik losing power in navi mumbai

ताज्या बातम्या