लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये ऐक्य भाव निर्माण व्हावा यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना समाजात रुजवली. या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिवसागणिक बदलत आहे. महोत्सवातील ऐक्य भाव दूर सारत ‘भव्य दिव्य’ या एकाच गोष्टीला प्राधान्य देत शहर परिसरातील विविध मंडळे सध्या कामाला लागली आहेत. यंदा विविध वाहिन्यांवरील धार्मिक मालिकांचा गणेशोत्सवातील सजावटीवर पगडा राहणार असून अनेक मंडळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
कधी काळी गणेशोत्सव पहावा तो मुंबई-पुण्याचा या इर्षेने भारावलेली मंडळी खास तेथील वारी करत असत. पण गेल्या काही वर्षांत शहर परिसरातील गणेशोत्सवाचे रूप पालटले आहे. मुंबई-पुण्याच्या भव्यतेचे अनुकरण करताना अनेकांनी त्याला कल्पकतेची जोड दिल्याने शहरातील काही मंडळे आकर्षक सजावटीने सर्वाचे लक्ष वेधून घेतात. रविवार कारंजा येथील श्रीसिद्धी विनायक मित्र मंडळ त्यापैकीच एक. यंदा मंडळ धार्मिक देखाव्याची सजावट करणार असल्याचे मंडळाचे नितीन पवार यांनी सांगितले. मुंबई नाका युवक मित्र मंडळ सालाबादाप्रमाणे तीच भव्य गणेशमूर्ती कायम ठेवणार असून सजावट काय करायची यावर मंथन सुरू आहे, असे वाल्मीक मोटकरी यांनी सांगितले.
महंत गणेश मित्र मंडळातर्फे कुठल्याही प्रकारची सजावट न करता पारंपरिक महंत गणेश मूर्तीची पूजा-अर्चना होणार असून मिरवणुकीच्या दिवशी जिवंत देखावा सादर करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गजानन शेलार यांनी सांगितले. इतर सार्वजनिक मंडळांच्या वतीने २१ फूटाहून अधिक उंचीचा लालबागचा राजा, नाशिकचा राजा अशा भव्य मूर्तीसह आकर्षक विद्युत रोषणाई, एलईडी, डीजे, म्युझिकल लाईटिंग यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, घरगुती सजावटीत सार्वजनिक मंडळासारखी भव्यता नसली तरी ही सजावट कल्पक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सजावटकार नीलेश देशपांडे यांनी सांगितले. अनेकांकडून बालाजी, तुळजाभवानी, संत तुकाराम, गजानन महाराज यांच्या जीवन कार्यातील निवडक प्रसंगावर रांगोळी अथवा मूर्ती सजावटीच्या माध्यमातून देखाव्यांची मागणी आहे. ‘यळकोट यळकोट जयमल्हार’चेही प्रस्थ यंदा वाढले असल्याचे देशपांडेंनी सांगितले. यंदा विविध वाहिन्यांवर ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी धार्मिक मालिकांचा सपाटा सुरू आहे. गणेशोत्सवावर या मालिकांची छाप पडली असून गणेशभक्तांकडून कुठल्या तरी एका अध्यायावर, एका प्रसंगावर मूर्ती तसेच सजावटीची मागणी होत आहे. त्यात श्रीकृष्ण जन्म, दत्ताचा जन्म तसेच महाभारतातील काही निवडक प्रसंगांचा समावेश आहे. याशिवाय स्त्री-भ्रूण हत्या आणि पर्यावरणाशी संबंधित देखाव्याची मागणी होत असल्याचे सजावटकार तसेच मूर्तिकार किरण भोईर यांनी सांगितले. मूर्तीच्या बाबतीत गणेशाच्या लंबोदर, वक्रतुंड, विघ्नहर, भालचंद्र, गौरीसुताय या विविध रूपांसह बाल गणेशा, जय मल्हार, साई गणेश, बालाजी गणेश आदींना ग्राहकांची विशेष मागणी असल्याचे मूर्तिकार शांताराम मोरे यांनी सांगितले. काही सार्वजनिक मंडळांना सजावटीसाठी बाहेरून म्हणजे मुंबई, इंदूर येथून कलाकार आयात करावे लागत आहेत. गणेशोत्सवाद्वारे प्रबोधन ही संकल्पना मोडीत काढत युवा वर्ग केवळ भव्यतेला महत्व देत असल्याची खंत सजावटकार आनंद ढाकीफळे यांनी व्यक्त केली.