गंगाखेड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मात्र बेपत्ता आहेत. शहरवासीयांचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासह पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सत्ताधारी गटास दिला. परिणामी शहराचे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार असल्याचे संकेत आहेत.
गंगाखेड पालिकेवर काँग्रेस-भाजपा-शिवसेना आमदार घनदाट मित्रमंडळाच्या युतीची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर आहे. काँग्रेस आघाडी सत्ताधाऱ्यांचे पाणीटंचाईचे दुर्लक्ष होत असल्याचा विषय राष्ट्रवादीने उचलून धरण्याचे ठरविले आहे. शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गत १२ दिवसांपासून शहराच्या सर्व भागात निर्जळी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मासोळी मध्यम प्रकल्प व गोदावरी नदीत मुबलक पाणीसाठा असूनही नियोजन व तांत्रिक दुर्लक्षामुळे शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांची भेट घेऊन पाणीटंचाईच्या मुद्यावर त्यांना धारेवर धरले. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास पालिकेला टाळे ठोकण्याचा इशाऱ्याने सत्ताधारी मंडळी बॅकफूटवर आली आहे.
शिष्यमंडळाशी चर्चेनंतर माजी नगराध्यक्ष डॉ. केंद्रे व शहराध्यक्ष प्रमोद साळवे यांनी सर्व नगरसेवकांसमवेत पत्रकार परिषद घेतली. डॉ. केंद्रे म्हणाले की, सद्य सत्ताधिकाऱ्यांना सत्तेवर येऊन येत्या २१ डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होईल. या एक वर्षांच्या कार्यकाळाचा हिशेब आम्ही विरोधक मागणार आहेत. सत्ताधारी मंडळीने महत्त्वाच्या विकास कामांना बगल देत स्वहिताची कामे केली. जलवाहिनीचे काम अर्धवट आहे. कर्मचारी व सफाई कामगारांच्या वेतनाचा प्रश्न रखडला आहे. बनावट जाहिरातीचा आधार घेऊन बनावट कामे करून बिले उचलण्याची नगरसेवकांची स्पर्धा लागली आहे. स्थानिक आमदारांच्या इच्छेनुसार त्यांच्या हातात पालिकेची सत्ता आहे. मात्र, त्यांनी आता अकार्यक्षमतेची जबाबदारी घेण्याची तयारी ठेवावी. शहराध्यक्ष साळवे यांनी २१ डिसेंबरला राष्ट्रवादीच्या वतीने दिलकश चौकात जाहीर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांना विकासकामांचा व पाणीटंचाईचा जाब विचारणार असल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2012 रोजी प्रकाशित
गंगाखेडला तेरा दिवसांपासून निर्जळी
गंगाखेड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मात्र बेपत्ता आहेत. शहरवासीयांचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासह पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सत्ताधारी गटास दिला.

First published on: 13-12-2012 at 02:04 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangakheda river has no water from 13 days