दुष्काळात पाण्यासाठी जनतेला दाही दिशा फिरू द्यायचे नाही, या ध्येयाने प्रेरित होऊन मुरुडकरांची तहान भागवण्याचे पुण्यकर्म स्थानिक कल्पक नेतृत्वाने केले.
५० हजारांवर लोकवस्तीच्या मुरूडला रायगव्हाण मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. परंतु या वर्षी पावसाअभावी प्रकल्प कोरडा पडला. त्यातच ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. मुरूडकरांना पाण्यासाठी वणवण फिरू देणार नाही, या एकाच आश्वासनावर राष्ट्रवादीचे दिलीप नाडे यांनी सर्व १७ जागांसह निवडणूक जिंकली. आश्वासन दिले. परंतु धरणात पाणी नाही, अशा स्थितीत गावातील विहीर, बोअर अधिग्रहण करून, रायगव्हाण प्रकल्पात १०० बाय ४०चे ३० फूट खोल सहा खड्डे घेऊन मुरूडकरांना पाणीपुरवठा सुरू झाला. जुन्या विहिरीतील गाळ काढणे, तळय़ात खड्डे घेऊन पाणी पुरवणे सुरू झाले. परंतु पाण्याचे हे स्रोत तोकडे होते. बोअर आटले. विहिरी आटल्या. पाणी कुठेच नव्हते. अशा स्थितीत मांजरा धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित केले गेले. मांजरा धरणातून शिराढोणचे व्यापारी उत्कर्ष संगवे व जिल्हा परिषद सदस्य कांचनमाला संगवे यांच्या शेतीसाठी १४० एम.एम.ची ५ किलोमीटर पाइपलाइन आहे. ही पाइपलाइन संगवे दाम्पत्याने विनामूल्य मुरूड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठय़ास दिली. चार किलोमीटर पाइपलाइन शिराढोण संपवेलपर्यंत करण्यात आली. तेथून मुरूडला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरगाव फिल्टरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला.
आश्वासन पूर्तता, जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरल्याबद्दल राष्ट्रवादीचे दिलीप नाडे यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीने स्वनिधीतून १८ ते २० लाख रुपये खर्च करून योजना पूर्णत्वास नेली. रात्रंदिवस काम करीत अडचणींना सक्षमपणे तोंड देत मुरूडहून आणलेल्या नवीन टीमच्या मदतीने केवळ २० दिवसांत योजना पूर्णत्वास नेली. परिणामी, मुरूडकरांचे भविष्यात होणारे पाण्याचे हाल संपल्यात जमा आहेत. मांजरा धरण ते मुरूड ही साडेअकरा कोटी खर्चाची कायमस्वरूपी पाणीयोजना राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून सरकारकडे मंजुरीच्या स्तरावर असून, महिना-दीड महिन्यात योजनेचे काम सुरू होईल, असे नाडे यांनी सांगितले. या योजनेसाठी कळंब नगरपालिका, कळंबचे नगराध्यक्ष, सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे यांच्या सहकार्य लाभल्याबद्दल नाडे यांनी आभार मानले.
जनरेटरद्वारे पाणीपुरवठा
मुरूड पाणीपुरवठय़ासाठी वीजजोडणी मिळत नव्हती. अशा स्थितीत ३० केव्हीआर क्षमतेच्या जनरेटरद्वारे बोरगावच्या फिल्टरमध्ये पाणी आणण्याचे काम ग्रामपंचायत करीत आहे. दुष्काळी स्थितीत जनरेटरद्वारे पाणीपुरवठा करणारी मुरूड ही राज्यातील बहुधा एकमेव ग्रामपंचायत असावी.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
जनरेटरच्या साहाय्याने भागवली ५० हजार लोकवस्तीची तहान
दुष्काळात पाण्यासाठी जनतेला दाही दिशा फिरू द्यायचे नाही, या ध्येयाने प्रेरित होऊन मुरुडकरांची तहान भागवण्याचे पुण्यकर्म स्थानिक कल्पक नेतृत्वाने केले.
First published on: 20-04-2013 at 12:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Generator used for water supply